मुंबई : ठाणे – भिवंडी प्रवास अवघ्या ५ ते ७ मिनिटांत करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कोलशेत – काल्हेर खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी निविदा प्रक्रिया राबववून एका कंपनीची नियुक्ती केली. मात्र प्रकल्पस्थळावरील काही तांत्रिक अडथळ्यांमुळे निविदा रद्द करण्यात आली होती. आता हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएकडून कोलशेत – काल्हेर खाडीपुलाच्या संकल्पन आणि बांधकामासाठी गुरुवारी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

औद्योगिक केंद्र, विणकरांचे शहर म्हणून भिवंडी ओळखली जाते. येथे विविध उद्योगधंदे असून या ठिकाणी मोठ्या संख्येने अवजड वाहने येत-जात असतात. तर भिवंडीतून ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मागील काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, भिवंडी – ठाणे प्रवास वाहनचालक – प्रवाशांना किमान ४५ मिनिटे वाया घालवावी लागतात, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही अडचण, गैरसोय लक्षात घेऊन एमएमआरडीएने ठाणे – भिवंडी प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी कोलशेत – काल्हेर खाडीपूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १.६४ किमी लांबीच्या आणि २७४ कोटी रुपये खर्चाच्या खाडीपुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली. या निविदेत अशोका बिल्डकाॅन लिमिटेडने बाजी मारली आणि २०२४ मध्ये कंत्राट मिळविले.

कंत्राट अंतिम झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र प्रकल्पस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. प्रकल्प संरेखनात काही बदल करावे लागले आणि शेवटी ही निविदा प्रक्रियाच रद्द करावी लागली. आता या प्रकल्पाच्या संकल्पन आणि बांधकामासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.

खर्च ४३० कोटी रुपयांवर

एमएमआरडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार कोलशेत – काल्हेर खाडीपूल सहापदरी आणि २.२ किमीचा आहे. या पुलाचा खर्च २७४ कोटी रुपयांवरुन आता ४३० कोटी रुपयांवर गेला आहे. निविदेनुसार या प्रकल्पाच्या संकल्पन आणि बांधकामासाठी ३६ महिन्यांचा अर्थात तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संकल्पन पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर काम सुरु झाल्यापासून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे ठाणे – भिवंडी प्रवास ५ ते ७ मिनिटांत पार करण्यासाठी ठाणेकर, भिवंडीकरांना काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.