मुंबई : वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेसाठी लवकरच नवीन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान १४ फेब्रवारीला मुलुंड येथे झालेल्या अपघाताप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन सल्लागाराची हकालपट्टी करण्यात आली होती. या मार्गिकेच्या कामाला वेग देण्याच्यादृष्टीने नवीन सल्लागाराची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आयेशा आणि कन्सल्टिंग इंजिनीअर्स ग्रुप (सीईजी) या कंपनीकडे सल्लागाराची जबाबदारी दिली जाणार आहे.
एमएमआरडीएने मेट्रो ४ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान १४ फेब्रुवारीला दुपारी १२.१५ च्या सुमारास मुलुंड, एलबीएस रोड येथे वजनदार सिमेंटचा कठडा कोसळला. हा कठडा रस्त्यावरून जाणाऱ्या एक रिक्षा आणि मोटारगाडीवर पडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एमएमआरडीएचा कारभार, नियोजन आणि मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यानच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
एमएमआरडीएच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करून कंत्राटदार, सल्लागार, अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परिणामी, मेट्रो ४ मार्गिकेसाठी सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या डीबी – एचआयआयएलएल – एलबीजी कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन एमएमआरडीएने या कंपनीची हकालपट्टी केली. तसेच या कंपनीला काळ्या यादीतही टाकण्यात आले. सल्लागाराची हकालपट्टी केल्यानंतर मेट्रो ४ मार्गिकेसाठी नवीन सल्लागाराची नियुक्ती करणे गरजेचे आहे. या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता आहे. त्यामुळे एमएमआरडीएने आता नवीन सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.
आयेशा अँड कन्सल्टिंग इंजिनीअर्स ग्रुप (सीईजी) या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या कंपनीकडे मेट्रो ४ मार्गिकेची जबाबदारी दिली जाणार आहे. आयेशा ही स्पॅनिश कंपनी असून सीईजी या भारतीय कंपनीशी संयुक्त भागीदारी करून आयेशा आणि सीईजी कंपनी मेट्रो ४ मार्गिकेसाठी सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, डीबी – एचआयआयएलएल – एलबीजी कंपनीकडून मेट्रो ४ च्या कामादरम्यान प्रचंड हलगर्जीपणा केला जात होता. या कंपनीला एमएमआरडीएने १५० हून अधिक नोटीसा बजावल्या होत्या. पण इतक्या नोटीसा बजावल्यानंतरही एमएमआरडीएने कोणतीही कारवाई केली नव्हती. सल्लागाराला अभय देण्यात येत होते. मुलुंड अपघातानंतर एमएमआरडीएच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे अखेर एमएमआरडीएने सल्लागाराची हकालपट्टी केली.

