मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या ४८,०७२.५७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास सोमवारी मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी असा तिसरी मुंबई आणि नवीन मेट्रो प्रकल्पांसाठी यात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पात सुमारे ८७ टक्के तरतूद केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांवर आहे. दरम्यान २०१७-१८ नंतर यंदा पहिल्यांदाच शिलकीचा १७ लाख रुपयांचा अर्थसंकल्पही मांडण्यात आला.
तिसर्या मुंबईचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव अशी ४ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील १२४ गावांचा आणि अंदाजे३२३.४४ चौ. किमी क्षेत्राचा विकास तिसर्या मुंबईअंतर्गत केला जाणार आहे. तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा विकसित करण्यासह अन्य कामांसाठी हा निधी वापरला जाईल. तर रायगड पेण विकास केंद्रासाठी ५०० कोटी, खारबाव (भिवंडी) एकात्मिक बिझनेस पार्कसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात तिसर्या मुंबईसह नवीन मेट्रो मार्गिकांची कामे मार्गी लावण्यासाठी १३ हजार ८३८ कोटी, दुहेरी बोगदा प्रकल्पांना गती देत मुंबईत भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी ५ हजार ५४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मेट्रो, उन्नत रस्ते, सागरी सेतू, सागरी मार्ग, भुयारी मार्ग यांसह अनेक प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून राबवले जात आहेत. त्यानुसार हे सर्व प्रकल्प चालू आर्थिक वर्षात वेगाने मार्गी लागावेत यासाठी अर्थसंकल्पातील एकूण तरतुदींपैकी ८७ टक्के तरतूद ही केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे.
विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
‘एमएमआरडीए’चा अर्थसंकल्प ‘एमएमआर’च्या विकासाला गती देणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर अर्थसंकल्पातील ८७ टक्के तरतूद प्रकल्पांसाठी केल्याने यातून सरकारचा प्राधान्यक्रम स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तसेच ‘एमएमआरडीए’चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मुंबई आणि ‘एमएमआर’मध्ये पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे केल्याचे ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
आतील पानाचा पॉईंटर
’बीकेसी ७० कि.मी.चे
भुयारी मार्ग : १,१८९
’अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी : ६०३
’आनंद नगर ते साकेत
उन्नत मार्ग : ८८०.१२
’ठाणे खाडी किनारा मार्ग : ७५
’कल्याण रिंगरोड : ६००
’वरळी-शिवडी
उन्नत रस्ता : ९३९
’साकेत (ठाणे) ते आमणे जोडरस्ता : ५००

