मुंबई : मुंबईतील सरकारी कार्यालयात सुरू असलेल्या उपाहारगृहांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयातील उपाहारगृहाची तपासणी करण्यात आली. यावेळी उपाहारगृहाच्या कंत्राटदाराकडून विना नोंदणी आणि विना परवाना उपाहारगृह चालविण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार एफडीएने उपाहारगृह तात्काळ बंद केले असून कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बीकेसीतील एमएमआरडीएच्या मुख्यालयातील उपाहारगृहाची सोमवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अन्न सुरक्षा नियमावलीतील काही तरतुदींचे उल्लंघन कंत्राटदाराकडून करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना असणे बंधनकारक आहे. असे असताना एमएमआरडीएच्या उपाहारगृहाच्या कंत्राटदाराकडून विना परवाना, विना नोंदणी उपहारगृह चालविले जाणे, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपाहारगृह तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती एफडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, याविषयी एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

परवाना नूतनीकरणासाठी अर्ज

कंत्राटदाराकडे नोंदणी व परवाना होता, मात्र त्याने परवाना व नोंदणीचे नूतनीकरण केले नव्हते. काही दिवसांपूर्वी नूतनीकरणासाठी कंत्राटदाराने अर्ज केला होता. मात्र, पुढे पाठपुरावा करून नोंदणी व परवाना प्राप्त करून घेतला नव्हता आणि उपाहारगृह सुरूच होते. त्यानुसार एफडीएने कारवाई केल्याचे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले. तर नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, मात्र परवाना व नोंदणीचे नूतनीकरण झाले नव्हते, यास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच, नवीन परवाना व नोंदणी पूर्ण झाली असून लवकरच उपाहारगृह पुन्हा सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.