मुंबई : मिरा – भाईंदरवरून वसई – विरारला रस्तेमार्गे जाण्यासाठी आजघडीला मोठा वळसा घालून जावे लागते. यात ४५ ते ६० मिनिटांचा वेळ जातो. मात्र येत्या काही वर्षांत मिरा-भाईंदर ते वसई-विरार हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. कारण नायगाव खाडीवर दुमजली खाडी पूल बांधण्यात येणार आहे. या दुमजली खाडी पुलाच्या वरच्या स्तरावरून मेट्रो, तर खालच्या स्तरावरून वाहने धावणार आहेत.

मेट्रो १३ (मिरा-भाईंदर ते वसई-विरार) मार्गिकेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ४.९८ किमी लांबीच्या दुमजली खाडी पुलाच्या प्रस्तावास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १६० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाणार असून त्यानंतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. हा दुमजली खाडी पूल सेवेत दाखल झाल्यानंतर राज्यातील पहिला दुमजली खाडी पूल ठरणार आहे.

दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार मेट्रो १३ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. या मार्गिकेच्या सुधारित संरेखन आणि आराखड्यास १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या १६० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचवेळी या मार्गिकेअंतर्गत नायगाव खाडीवर दुमजली खाडी पूल उभारण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यास दुजोरा दिला. मिरा-भाईंदरवरून वसई-विरारला जाण्यासाठी सध्या मोठा वळसा घालावा लागतो. यात बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे नायगाव (भाईंदर) खाडी पूल उभारण्याची मागणी वसई-विरारकरांकडून होत होती.

यासाठी राजकीय पक्षांसह स्थानिकांकडूनही पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, मेट्रो १३ मार्गिकेची आखणी करण्यात आली. ही मार्गिका नायगाव खाडी पुलावरून जाणार असल्याने येथे दुमजली खाडी पूल उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार एमएमआरडीएने यावर काम सुरू केले. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) माध्यमातून याचा अभ्यास करण्यात आला आणि आराखडा तयार करण्यात आला. दुमजली पूल बांधणे व्यवहार्य ठरल्याने अखेर तो नायगाव खाडी पूल बांधण्याचा निर्णय अंतिम करून त्यासंबंधीचा प्रस्ताव १६० व्या प्राधिकरण बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने राज्यातील पहिल्या दुमजली खाडी पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रस्तावानुसार हा दुमजली खाडी पूल ४.९८ किमी लांबीचा व २८.६० मीटर रुंदीचा आहे. वाहनांसाठीचा पूल सहापदरी असणार असून खालच्या स्तरावरून वाहने धावतील, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावेल. या दुमजली खाडी पुलासाठी सुमारे १,६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पुलामुळे मिरा-भाईंदर ते वसई-विरार हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होणार असल्याने मिरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास अधिक सुकर व आरामदायी होणार आहे. या दुमजली खाडी पुलाला मान्यता मिळाल्याने आता हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावला जाणार आहे.