मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा एमएमआरडीएने पूर्ण केला आहे. या मार्गिकेतील मंडाले कारशेडचे काम पूर्ण झाले असून ही कारशेड आता मेट्रो गाड्यांच्या संचलनासाठी सज्ज झाली आहे. मंडाले येथील ३०.४५ हेक्टर जागेवर उभारण्यात आलेल्या या कारशेडमध्ये एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. मंडाले कारशेड नाविन्यता आणि कल्पकतेचे उत्तम उदाहरण असून ही कारशेड आशियातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक कारशेड असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मार्गिकेचा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २३.६४ किमी लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली जाणार असून या उपनगरांमधील प्रवास अतिजलद होणार आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून मंडाले – डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी डायमंड गार्डन – मंडाले पहिला टप्पा पूर्ण झाला असून या टप्प्याच्या संचलनाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. आता या मार्गिकेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा मंडाले कारशेडचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून ही कारशेड मेट्रो संचलनासाठी सज्ज झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

कारशेडमध्ये अनेक सुविधा

मेट्रो २ ब मार्गिकेतील कारशेड ३०.४५ हेक्टर जागेवर उभारण्यात आली आहे. यात ७२ स्टेबलिंग लाईन्स आहेत, तिथे एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येऊ शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या स्टेबलिंग लाईन्स द्विस्तरीय आहेत. एका मजल्यावर ३६ आणि दुसऱ्या मजल्यावर ३६ अशा मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. या कारशेडमधील रुळाची लांबी एकूण २९ किमी अशी आहे. गाड्यांच्या चाचण्यांसाठी रुळांचे जाळे देशातील सर्वात मोठे असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. मेट्रो गाड्यांच्या दुरुस्तीसाठी १० मार्गिका असून गाड्या धूण्यासाठी ऑटो वाॅश प्लांट उभारण्यात आला आहे. या कारशेडमध्ये तीन मजली नियंत्रण कक्ष आणि एक प्रशिक्षण केंद्र आहे. ही आशियातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक कारशेड असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. तर मंडाले परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने या कारशेडच्या उभारणीदरम्यान पर्यावरणाला कुठेही धक्का पोहचविण्यात आला नसल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.

कारशेड सज्ज, सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त,पण पहिल्या टप्प्याची प्रतीक्षाच मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले या ५.६ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम केव्हाच पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचे लोकार्पण ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र या मार्गिकेस ८ ऑक्टोबरपर्यंत सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता नसल्याने लोकार्पण लांबणीवर पडले. त्यानंतर काही दिवसांनी या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात लोकार्पणाचा घाट घालण्यात आला. मात्र काही कारणाने हा मुहूर्तही रद्द झाला आणि लोकार्पण लांबले.

मुंबईकर वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत, लोकलचे धक्के सहन करत आहेत, मंडाले – डायमंड गार्डन प्रवासासाठी त्यांना बराच वेळ वाया घालवावा लागत आहे. असे असताना मेट्रोसारखा अत्याधुनिक आणि अतिजलद पर्याय सज्ज असूनही केवळ लोकार्पणाअभावी ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊ शकलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर लोकार्पण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. दरम्यान, हा टप्पा केव्हा सुरु होणार याचे उत्तर एमएमआरडीएकडेही नाही. राज्य सरकारकडून जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा लोकार्पण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.