मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोसह इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामादरम्यानच्या अपघातांच्या मालिकांनंतर अखेर एमएमआरडीएला जाग आली आहे. प्रकल्पाच्या कामादरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी अखेर एमएमआरडीएने सुरक्षा व प्रतिसाद समन्वय केंद्र (कक्ष) स्थापन केले. हे केंद्र कार्यान्वित झाले असून या केंद्राच्या माध्यमातून प्रकल्पाशी संबंधित समस्या नोंदवणे, प्रकल्पातील सुरक्षा उपाययोजनांवर देखरेख ठेवणे व समन्वय साधणे शक्य होणार आहे.

मेट्रो, सागरी सेतू, सागरी मार्ग, जोडरस्ते, उन्नत मार्गिका, बोगदे अशा अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामादरम्यान त्यातही मेट्रोच्या कामादरम्यान काही वर्षांपासून सातत्याने अपघात होत आहेत. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान १६ हून अधिक अपघात झाले असून यात अंदाजे सात जणांचा मृत्यू झाला आहे.

मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गिकेतही अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामादरम्यानच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांच्या घटना रोखणे व प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करणे यासाठी एमएमआरडीएने प्रतिसाद व समन्वय कक्ष स्थापन केला आहे.

एक नियंत्रण कक्ष, एक क्रमांक व एक समन्वय केंद्र अशी ही संकल्पना आहे. या कक्षात एमएमआरडीएचे अभियंते, कंत्राटदार, सल्लागार यांचाही समावेश आहे. २४×७ नियंत्रण कक्ष म्हणून हा कक्ष कार्यान्वित असणार असून नागरिकांना १८०० २२ ८८०१ टोल फ्री क्रमांकावर आपल्या प्रकल्पाशी संबंधित तक्रारी नोंदविता येणार आहेत. प्रकल्पांशी संबंधित आपत्कालीन स्थिती, संभाव्य सुरक्षाविषयक धोके व सार्वजनिक तक्रारी नियंत्रण कक्षामार्फत नोंदवू शकतात. त्यात बांधकाम स्थळावरील सुरक्षा, रस्ता रोधक, प्रकल्पांच्या कामांभोवतीचे वाहतूक व्यवस्थापन, बांधकामामुळे रस्त्यांची झालेली खराब स्थिती वा नुकसान, धूळ तसेच प्रकल्पांशी संबंधित इतर गैरसोयींचा समावेश असू शकतो.

‘एमएमआरडीए’च्या कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची वा समस्येची नोंद केली जाईल. त्यानंतर तक्रारीचे स्वरूप लक्षात घेऊन तातडीने मार्गी लावायच्या तक्रारींचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर पडताळणी करून पुढील कार्यवाही करून तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. संबंधित अभियंत्यांच्या माध्यमातून तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. दरम्यान, या कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याने तक्रारींचे योग्य व तातडीने निवारण होणार असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएने केला आहे.

प्रकल्पांवर बारीक नजर

एमएमआरडीए व कंत्राटदार, सल्लागार यांच्यातील समन्वय यामुळे सुधारणा होणार असल्याने प्रकल्पादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी होणार असल्याचेही म्हटले जात आहे. प्रकल्पांची कामे सुरू असताना एमएमआरडीएची प्रतिसाद, समन्वय यंत्रणाही तितकी सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच समन्वय, प्रतिसाद कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामुळे प्रकल्पांवर आता आमची बारीक नजर राहील. प्रकल्पस्थळावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणीही कठोर, योग्य प्रकारे होणार असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.