मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील मिरा-भाईंदर येथे उभारण्यात आलेल्या तिसरा दुमजली उड्डाणपूल रचनेमुळे वादात अडकला आहे. चार मार्गिकेचा पुल पुढे दोन मार्किगेचा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताची भीती व्यक्त होत आहे. तर या पुलावरुन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) टीका होत असून खिल्लीही उडवली जात आहे. अशा या पुलाची गुरुवारी वाहतूक पोलिसांनी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलिसांनी पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करत फेब्रुवारीअखेरीस हा पूल वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. तर हा पूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच, हा पूल सुरक्षित ठरेल असा दावा करण्यात आला आहे.

मेट्रो ९ मार्गिकेच्या खांबांमुळे मिरा-भाईंदर परिसरातील रस्ते अरूंद झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीएने मिरा-भाईंदर परिसरात तीन दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीनपैकी दोन दुमजली पूल पूर्ण झाले असून ते वाहतूक सेवेत दाखल आहेत. तर तिसरा मिरा-भाईंदर येथील जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदान असा १८०० मीटर लांबीचा दुमजली पूल पूर्ण झाला आहे. आता केवळ अंतर्गत कामे पूर्ण होणे शिल्लक आहेत. ही कामे पूर्ण करत फेब्रुवारीत हा पूल सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. पण हा पूल सेवेत दाखल होण्याआधीच वादात अडकला असून या पुलाच्या रचनेवरुन एमएमआरडीएवर टीका होत आहे.

समाज माध्यमावर या पुलाच्या रचनेवरुन खिल्ली उडवली जात आहे. एमएमआरडीएने मात्र पुलाच्या रचनेत कुठेही दोष नसून तो सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. तर पुढे पुलाचा भाईंदर पश्चिम-पूर्व असा विस्तार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच पुलाची रचना चार मार्गिकेवरुन पुढे दोन मार्गिका अशी करण्यात आल्याचेही स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून दिले जात आहे. दरम्यान, समाज माध्यमातून होणाऱ्या टीकेनंतर आता एमएमआरडीएने पूल वाहनचालक-प्रवाशांच्यादृष्टीने सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशात गुरुवारी वाहतूक पोलिसांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.

पुलाची पाहणी केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी काही उपाययोजना सुचविल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. दुभाजकासंबंधी, वाहतुकीच्यादृष्टीने आवश्यक ती चिन्हे लावण्यासंबंधी आणि अन्य काही उपाययोजनांचा यात समावेश आहे. या उपाययोजनांची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या उपाययोजनांची अंमलबजावणी करत उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी आता आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे आता हा पूल फेब्रुवारीअखेरीस वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.