मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्पाच्या कामादरम्यान अपघात होण्याच्या आणि त्यात जिवितहानी होण्याच्या घटना काही थांबत असल्याचे दिसत नाहीत. त्यातही जे काही अपघात होत आहेत, त्यातील सर्वाधिक अपघात हे जे कुमार कंपनीच्या कामादरम्यान होत आहेत. सोमवारी रात्री उशिरा उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान लोखंडी फ्रेम क्रेन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाताना एका मजुराच्या पोटाला आणि छातीला लागली. यात तो बेशुद्ध पडला.

त्याला तात्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात क्रेन चालकासह सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून अटल सेतुला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम सुरू आहे.

या कामादरम्यान फेब्रुवारीमध्ये उंचावरून एक सळई कोसळून तरुणाच्या डोक्यावर आदळली होती. यात तरुण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर याच प्रकल्पात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे. सोमवारी रात्री उशिरा केईएम रुग्णालयानजीक एक अपघात झाला. आचार्य दोंदे मार्ग ते परळ टीटीदरम्यान चार लोखंडी फ्रेम क्रेन घेऊन जाण्याचे काम कामगारांकडून सुरू होते. दोन फ्रेम पोहोचविल्यानंतर उर्वरित दोन लोखंडी फ्रेम क्रेन उचलून नेताना क्रेनचालकाच्या निष्काळजीपणामुळे क्रेन हलल्याने लोखंडी फ्रेम हलली आणि जवळच असलेल्या कामगार रवी गिरी (१९ वर्ष) याच्या छातीत आणि पोटात लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी क्रेन चालक मोहम्मद अनस शेख (२५ वर्ष) आणि सुपरवायझर अनिल शिवदयाल गिरी (३२ वर्ष) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी रात्री केईएम रुग्णालयानजीक काम सुरू असताना सुपरवायझर कामाच्या ठिकाणी गैरहजर होता. त्यामुळे त्याच्यासह क्रेनचालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान जे कुमार कंपनीकडून कामादरम्यान सातत्याने निष्काळजीपणा केला जात आहे, मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. मात्र त्याच्याविरोधात केवळ दंडात्मक कारवाई करत त्याला अभय दिले जात आहे. मेट्रो ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर) मार्गिकेच्या कामादरम्यान जे कुमारच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात ७ जणांचे बळी गेले आहेत. मात्र तरीही कंपनीविरोधात एमएमआरडीएकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला अभय दिले जात आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एमएमआरडीएचे मौन याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती वा प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडते आणि त्यात एका कामगाराचा बळी जातो. या प्रकरणी गुन्हा दाखल होतो तरी एमएमआरडीएकडून मौन बाळगले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.