मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील १० गावांचा विकास खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कमध्ये समाविष्ट आहे. आता आणखी ३४ गावांचा विकास खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कअंतर्गत करण्यात आला आहे. त्यानुसार ३४ गावांसाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध केला.

एमएमआरडीएने मुंबई नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अतिजलद करण्यासाठी अटल सेतू बांधला. अटल सेतूमुळे प्रभावित परिसरांमध्ये विकासाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या संधी लक्षात घेता एमएमआरडीएने खोपटा, पोयनाड, खारबाव, बोईसर, नेरळ, कर्जत आणि अलिबाग, पेण अशी आठ विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) विकसित करण्याचा निर्णय घेतला.

या आठपैकी एक खारबांव विकास केंद्राचा विकास आता खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्क म्हणून केला जाणार आहे. त्यानुसार भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील १० गावांचा समावेश या इन्टीग्रेटेड पार्कमध्ये करण्यात आला होता. सरकारने ५८.५२ हेक्टर क्षेत्र विकास केंद्र म्हणून विकासित करण्यास मान्यता दिली. एमएमआरडीएची १० गावांसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर एमएमआरडीएने इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यात आणखी काही गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता.

एमएमआरडीएच्या या प्रस्तावाला अखेर नगर विकास विभागाने मान्यता दिली. यासंबंधीचा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. शासन निर्णयानुसार भिवंडी तालुक्यातील ६ महसुली गावांचा (सुमारे ४४.१७ चौ. किमी) आणि भिवंडी परिसरातील अधिसूचित क्षेत्रातील २८ गावांचा (सुमारे ७३.४४ चौ. किमी)

समावेश इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कमध्ये करण्यात आला आहे. या गावांसाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कचा आराखडा तयार केला जाईल आणि त्यानंतर ४४ गावांचा विकास साधला जाईल.

नेरळ, कर्जत, पोयनाड, अलिबागमधील गावांचाही विकास

अटल सेतू प्रभावित परिसरात आठ विकास केंद्रे विकसित केली जाणार आहेत. त्यानुसार खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्कमधील अतिरिक्त ३४ गावांसाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी इतर चार विकास केंद्रांतील गावांच्या विकासाचाही मार्ग नगर विकास विभागाने मोकळा केला आहे. नेरळ परिसरातील ३४ गावांसाठी, कर्जत परिसरातील २८ गावांसाठी, पोयनाड परिसरातील ११ गावांसाठी आणि अलिबाग परिसरातील ११ गावांसाठीही एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचाही शासन निर्णयही मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण पाच विकास केंद्रांसाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने एमएमआरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.