मुंबई : दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेअंतर्गत बांधण्यात आलेल्या दुमजली पुलाखालील खड्डे बुजवण्याच्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा फटका वाहनचालकांना बसला आहे. खड्डे बुजवण्यासाठी सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता, रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद न करता गरम मॅस्टिक डांबर टाकण्यात येत होते. शनिवारी हे काम सुरू असताना एक दुचाकीस्वार डांबरावरून घसरून पडला आणि भाजला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान कंत्राटदार जे कुमार कंपनीकडून सातत्याने हलगर्जीपणा केला जात असताना त्याच्याविरोधात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, या प्रकरणी एमएमआरडीएने कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
मेट्रो ९ मार्गिकेचे काम जे कुमार कंपनीकडे आहे. या मार्गिकेचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक छोटेमोठे अपघात झाले असून त्यात अंदाजे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीकडून अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेचे काम सुरू असताना आग लागली होती. आरे ते कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेच्या कामादरम्यान स्थानकात पाणी शिरले होते. एमएमआरडीएच्या अनेक प्रकल्पांच्या कामादरम्यान सातत्याने या कंपनीकडून हलगर्जीपणा दाखवला जात असल्याचे चित्र आहे. आता शनिवारी रात्री मेट्रो ९ मार्गिकेच्या कामाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुलाखालील खड्डे बुजवण्याच्या कामादरम्यानही कंत्राटदाराने हलगर्जीपणा केला आहे. भर पावसात वाहतूक बंद न करता कंत्राटदाराने रस्त्यावर गरम मॅस्टिक डांबर टाकले
होते. गरम मॅस्टिक डांबर टाकण्यात आलेल्या भागालगत गतिरोधक लावण्यात आले नव्हते. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना दुचाकी घसरत होत्या. एक दुचाकीस्वार या रस्त्यावरून घसरला आणि त्यात तो गंभीर भाजला. त्याचा हात आणि पाय भाजला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी एक दुचाकीस्वारही भाजल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
दुचाकीस्वार गंभीर भाजल्यानंतर कंत्राटदाराने काम बंद केले. मात्र, या दुर्घटनेमुळे कंत्राटदाराचा हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे. या प्रकरणी अॅड. कृष्णा गुप्ता यांनी एमएमआरडीएकडे तक्रार दाखल केली आहे. तर, या प्रकरणाची दखल घेत कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. तर सल्लागार कंपनी सिस्ट्रा-सीईजी-एसएमसीआयपीएललाही ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच जखमी दुचाकीस्वाराच्या उपचाराचा खर्च कंत्राटदाराकडून केला जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून सातत्याने हलगर्जीपणा केला जात असून त्याच्याविरोधात केवळ दंडात्मक कारवाई केली जात असल्याने अॅड. गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच जखमी दुचाकीस्वाराला आर्थिक मोबदला देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
