मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) नियोजनशून्य कारभाराचा नमुना समोर आला आहे. अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेच्या कामाअंतर्गत चेंबूरमधील प्रार्थनास्थळावरून मेट्रो मार्ग नेण्यात आला आहे. प्रार्थनास्थळाचे स्थलांतर करून मेट्रो मार्गाचे बांधकाम करणे अपेक्षित असताना एमएमआरडीएने थेट त्यावरूनच मेट्रो मार्ग बांधला आहे. त्यामुळे मेट्रो २ ब मार्गिका कार्यान्वित झाल्यास प्रार्थनास्थळावरून मेट्रो धावणार आहे. यावरून आता मेट्रोच्या कामावर, नियोजनावर टीका होत असून प्रार्थनास्थळाचे योग्य पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. यामुळे नागिरकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा प्रकारचे बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणीही होत आहे.

अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिका २३.६ किमी लांबीची असून या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. यापैकी मंडाले ते डायमंड गार्डन दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. आता केवळ या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम वेगता सुरू आहे. आता एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभाराचा नमूना समोर आला आहे. चेंबूर येथील सिद्धार्थ नगर येथे एक प्रार्थनास्थळ आहे. हे प्रार्थनास्थळ मेट्रो २ ब मार्गिकेत बाधित होत असल्याने त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून मेट्रो मार्गिकेचे काम करणे आवश्यक होते. मात्र प्रार्थनास्थळ स्थलांतरीत न करताच एमएमआरडीएकडून त्यावरून मेट्रो मार्ग नेण्यात आला आहे.

खाली प्रार्थनास्थळ आणि वरून मेट्रो मार्ग असे चित्र या ठिकाणी आहे. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची कायम वर्दळ असलेल्या प्रार्थनास्थळावर मेट्रोचे बांधकाम कसे करण्यात आले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नियमानुसार मेट्रो वा इतर कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पात बाधित बांधकामाचे आणि प्रार्थनास्थळाचे योग्य प्रकारे स्थलांतर करण्यात येते. त्यानुसार या ठिकाणीही अशा प्रकारची कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र प्रार्थनास्थळ स्थलांतरीत न करताच मेट्रोचे काम करण्यात आले आहे.

बाधित प्रार्थनास्थळाचे स्थलांतर करण्याऐवजी एमएमआरडीएने ते वाचवण्यासाठी मेट्रोच्या खांबाची जागा बदलली. प्रार्थनास्थळाचा घुमट हटवला आणि त्यावरून मेट्रो मार्गाचे बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी केला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेट्रोमध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची झळ खालील प्रार्थनास्थळामधील नागरिकांना बसू शकते. तसेच मेट्रोखाली कोणतेही मोठे बांधकाम असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत मराठे यांनी या प्रार्थनास्थळाचे योग्य प्रकारचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. तर अशाप्रकारे नियोजनशून्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही मागणी केली आहे.