मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पस्थळांवरून बाहेर पडणारी माती आणि बांधकामाचा राडारोडा आसपासच्या परिसरात टाकणे हे हवा प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या दोन माजी न्यायमूर्तींच्या उच्चस्तरीय समितीने आपल्या मासिक अहवालात नोंदवले आहे. तसेच, संबंधितावर कारवाई केली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करून एमएमआरडीएला सर्व प्रकल्पांची तपासणी करण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईसह एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरत असून रस्त्यांवरील माती, कचरा जाळणे, बांधकामाचा राडारोडा आणि वाहनांमधून बाहेर पडणारा धूर ही प्रदूषणाची प्रमुख कारणे असल्याचेही माजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या द्विसदस्यीय उच्चस्तरीय समितीने २९ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या सातव्या अहवालात नमूद केले आहे. समितीने या अहवालात मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषण नियंत्रणाच्या तयारीचा आढावा घेतला असून हिवाळ्यात आणि कोरड्या हवामानात प्रदूषण वाढण्याची शक्यता असल्याने महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीए यांना हिवाळा सुरू होण्यापूर्वी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे समितीने मुख्यत्वे स्पष्ट केले आहे. बांधकाम साहित्य आणि राडारोडा वाहून नेणारी वाहने वरून पूर्णपणे झाकावीत. तसेच, रस्त्यांच्या कडेला साचणारी धूळ, पदपथ, दुभाजक आणि सेवा रस्त्याचीही (सर्व्हिस रोड) नियमित स्वच्छता करावी, अशी शिफारस समितीने अहवालात केली आहे.
एमएमआरडीएच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पस्थळांवरून बाहेर पडणारी माती आणि बांधकामाचा राडारोडा आसपासच्या परिसरात टाकणे याची आणि ही स्थिती हवा प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याची समितीने प्रामुख्याने दखल घेतली. शिवडी येथील प्रकल्पस्थळाच्या परिसरात राडारोडा टाकल्याचे छायाचित्रांसह निदर्शनास आणून दिल्यानंतरही एमएमआरडीएने संबंधितांवर कारवाई केली नसल्याबद्दल समितीने अहवालात नाराजी व्यक्त केली. तसेच, एमएमआरडीएने सर्व प्रकल्पांची तपासणी करून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे स्पष्ट केले.
समितीच्या शिफारशी
वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी. पीयूसी प्रमाणपत्र नसलेली, जास्त धूर सोडणारी, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणारी आणि बांधकाम साहित्य न झाकता नेणारी वाहने यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. यासाठी सीसीटीव्ही, ई-चलन आणि वाहनांच्या नोंदींचा वापर करण्याचेही समितीने स्पष्ट केले आहे. याशिवाय, १ एप्रिल २०२७ पासून डंपर आणि टिपर वाहने वरून पूर्णपणे झाकता येईल अशी यंत्रणा बसवणे बंधनकारक होणार असल्याकडेही समितीने अहवालत लक्ष वेधले आहे.
एमएमआरमधील प्रमुख महामार्गांच्या कडेला असलेल्या मातीच्या पट्ट्यांमुळेही मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याचे समितीच्या पाहणीत आढळले आहे. त्यामुळे अशा रस्त्यांच्या कडांचे डांबरीकरण किंवा अन्य पद्धतीने स्थिरीकरण करावे. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यास त्या भागात वाहनांची ये-जा आणि तेथे वाहने उभी करण्यास बंदी करावी. तोपर्यंत आठवड्यातून एकदा खोलवर स्वच्छता आणि रस्ते धुण्याची मोहीम राबवावी, असे आदेशही समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि एमएमआरडीएला दिले आहेत. रिकामे भूखंड, खाडीकिनारे, कांदळवने आणि पुलांखालील बेकायदा कचरा व राडारोडा टाकण्याची ठिकाणे स्वच्छ करण्याचेही समितीने म्हटले आहे. समितीने दोन महिन्यांनंतर पुन्हा आढावा घेण्याचे ठरवले असून, केवळ नोटिसा आणि दंडाची आकडेवारी न पाहता प्रत्यक्षात धूळ आणि प्रदूषण कमी झाले आहे का, याची तपासणी केली जाणार असल्याचे अहवालात शेवटी प्रामुख्याने नमूद केले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
पावसाळा संपल्यानंतर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील शहरांत प्रदूषणामुळे धुरक्याचे साम्राज्य पसरते. यंदाही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी या प्रकरणी स्वतःहून दाखल केलेली जनहित याचिका नुकतीच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली. त्यावेळी, या समस्येला आळा घालण्यासाठी विविध यंत्रणांतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी न्यायालयाने दोन माजी न्यायमूर्तींची उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे याचिकाकर्ते दयानंद स्टॅलिन यांच्यावतीने वरिष्ठ वकील द्वारकादास यांनी न्यायालयाला सांगितले.
या समितीतर्फे मासिक अहवाल सादर केला जातो. त्यात यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना किती प्रभावी ठरत आहेत याबरोबरच हवा प्रदूषणाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी शिफारशी सुचवण्यात येतात. तथापि, समितीने आतापर्यंत सादर केलेले मुंबई महापालिकेने आपल्याला अद्याप उपलब्ध केले नसल्याचेही याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन याचिकाकर्त्यांना हे अहवाल उपलब्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
