मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी २ आणि एमयूटीपी ३ मधील विविध प्रकल्पांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मंगळवारी आणखी १५० कोटी रुपये निधी वितरित केला. काही दिवसांपूर्वीच १५० कोटी रुपये निधी देण्यात आला होता. निधी मिळाल्याने रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना काहीशी गती मिळण्याची आशा एमआरव्हीसीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

एमयूटीपी २ मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, एमयूटीपी ३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल असे ११ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत.

या प्रकल्पांच्या कामांसाठी रेल्वे मंत्रालयाबरोबरच राज्य सरकारमार्फत एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करण्यात येतो. तर खासगी बँकांकडूनही निधी मिळतो. मात्र तीन वर्षांत राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचा निधीच एमआरव्हीसीला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पांच्या कामाची गती मंदावली होती. निधी मिळावा यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत गेल्या तीन ते चार महिन्यांत बैठकाही झाल्या. त्यानंतरही निधी उपलब्ध होत  नव्हता. एमएमआरडीएने अखेर ११ मेला १५० कोटी रुपये निधी एमआरव्हीसीला दिला. त्यानंतर १७ मेला आणखी १५० कोटी रुपये वितरित करण्यात आले. आता एमएमआरडीए उर्वरित ७०० कोटी रुपये टप्प्याटप्प्यांत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.