मुंबई – वडाळा–ठाणे–कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४अ मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड येथे सिमेंटचा वजनदार कठडा कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अखेर जाग आली असून मेट्रो ४ मार्गिकेच्या संपूर्ण कामाची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी स्वतंत्र विशेष सुरक्षा तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाने रविवारी कामास सुरुवात केली आहे. ही तपासणी पुढील चार दिवस चालणार आहे. तपासणीदरम्यान कामात व सुरक्षेच्या दृष्टीने आढळणाऱ्या सर्व त्रुटी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
मेट्रो ४ च्या कामादरम्यान कंत्राटदार आणि सल्लागारांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होत आहे. अवघ्या २४ तासांपूर्वी बसवण्यात आलेला कठडा अचानक कसा कोसळला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर कंत्राटदार कंपनीतील चार आणि सल्लागार कंपनीतील एक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
मात्र, तरीही मेट्रोची कामे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत असल्याने एमएमआरडीएने मेट्रो ४ आणि ४अ मार्गिकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मार्गिकांची सखोल सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) बसवराज भद्रगोंद यांच्या नेतृत्वाखालील या पथकात अन्य अधिकारी व अभियंत्यांचा समावेश आहे.
वडाळा ते सोनापूर या मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीची जबाबदारी अधीक्षक अभियंता अभिजीत भीशीकर यांच्याकडे देण्यात आली आहे, तर सोनापूर ते गायमुख मार्गिकेच्या सुरक्षा तपासणीचे काम कार्यकारी अभियंता मधुकर खरात यांना देण्यात आले आहे. या पथकाने रविवारी सुरक्षा तपासणी सुरू केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
अपघातस्थळासह संपूर्ण मेट्रो ४ आणि ४अ मार्गिकेतील कामाची सुरक्षा तपासणी या पथकाद्वारे केली जाणार आहे. कामात कुठे त्रुटी आहेत, कामादरम्यान कुठे धोका निर्माण होऊ शकतो, तसेच वर्दळीच्या भागात काम करताना आवश्यक ती सुरक्षितता पाळली जात आहे का, यासह विविध बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या उपाययोजना करून भविष्यात मुलुंडसारख्या मेट्रो दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. चार दिवसांच्या तपासणीनंतर या पथकाने नेमक्या कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

