मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली बोगदा प्रकल्प आणि ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दुय्यम कर्जाच्या रूपाने अर्थसहाय्य देण्यात आले. ठाणे – बोरिवली बोगद्यासाठी १५३ कोटी रुपये निधी, तर ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पासाठी ५७ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे या कामांना गती मिळणार आहे.
ठाणे – बोरिवली प्रवासासाठी एक ते दीड तासांचा कालावधी अवघ्या १५ मिनिटांवर आणण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ११.८ किमीच्या या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत दुय्यम कर्जाच्या माध्यमातून, तसेच बँकेकडून कर्ज आणि काही रक्कम स्वतः एमएमआरडीएकडून उभारली जाणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये २१० कोटी रुपये, जानेवारी २०२६ मध्ये १४० कोटी रुपये, जून २०२६ मध्ये १५ कोटी रुपये, असे एकूण ३६५ कोटी रुपये निधी या प्रकल्पासाठी दिला आहे. तर आता आणखी १५३ कोटी रुपये निधी देण्यात येणार असून, यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रकल्पासाठी आतापर्यंत राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीची एकूण रक्कम ५१८ कोटी रुपयांवर जाणार आहे. या अर्थसहाय्यामुळे प्रकल्पाच्या कामालाही गती मिळणार आहे.
ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह बोगद्यासाठी एकूण निधी २२२ कोटी रुपयांवर
- पूर्व मुक्त मार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. चर्चगेट, मरीन ड्राइव्हला जाण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. एमएमआरडीएने ऑरेंज गेट – मरीन ड्राइव्ह प्रवास अतिजलद करण्यासाठी ९.२ किमीचा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे.
- अंदाजे ९१५८ कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. ९१५८ कोटी रुपयांपैकी १८३२ कोटी रुपये निधी एमएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्या सहभागातून उभारला जात आहे. तर ८० टक्के, अर्थात ७३२६ कोटी रुपयांचा निधी बाह्य कर्ज उभारणीतून करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारने आतापर्यंत १६५ कोटी रुपये निधी या प्रकल्पासाठी दिला आहे.
- सप्टेंबर २०२५ मध्ये ९० कोटी रुपये, जानेवारी २०२६ मध्ये ६० कोटी रुपये, जून २०२६ मध्ये १५ कोटी रुपये इतका निधी सरकारने दिला आहे. तर आता ५७ कोटी रुपये निधी देण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत सरकारकडून मिळालेल्या एकूण निधीची रक्कम २२२ कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. हा निधी मिळाल्याने या प्रकल्पाच्या कामालाही वेग येणार आहे.
