मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास साधताना हवामान बदल आणि नगर नियोजनासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची (यूसीएल) मदत मिळणार आहे. एमएमआरडीए आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांच्यात या संदर्भात नुकताच सामंजस्य करार झाला. बांधकाम क्षेत्र आणि नगर नियोजनाच्या अभ्यासातील जगातील अग्रगण्य आणि २०० वर्षे जुन्या या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या सहकार्याने हवामान बदलाला सक्षमपणे तोंड देणाऱ्या नागरी व्यवस्था आणि शाश्वत नागरी, प्रादेशिक विकासासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यास ते देशातील पहिले उत्कृष्टता केंद्र ठरणार आहे.
हवामान बदल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हा एक गंभीर प्रश्न आहे. अशावेळी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची मदत एमएमआरडीएला होणार आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि एमएमआरडीए एकत्रित संशोधन, नवसंकल्पना, प्रशिक्षण, क्षमता विकास आणि ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत. या सहकार्यामुळे हवामान बदलाला तोंड देऊ शकणाऱ्या पायाभूत सुविधा आणि नागरी व्यवस्थेच्या नियोजनासाठी जगभरातील संशोधन, आधुनिक पद्धती आणि सर्वोत्तम अनुभवांचा महामुंबईमध्ये उपयोग केला जाईल. यामध्ये वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा, इमारती आणि पर्यावरणाशी संबंधित साधनसंपत्तीचा समावेश असेल. आधुनिक तंत्रज्ञान, हवामानातील बदलांशी जुळवून घेणाऱ्या पद्धती आणि निसर्गावर आधारित उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे.
भविष्यातील गरजांनुसार नियोजन
मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजन आणि व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), हवामान विश्लेषण, डिजिटल प्रतिकृती आणि आधुनिक पर्यावरणीय माहिती प्रणालींचा वापर करण्यावरही भर असेल. यामुळे कमी कार्बन उत्सर्जन, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता आणि भविष्यातील गरजांनुसार नियोजन करण्यास मदत होईल. तसेच हवामान बदलाचे परिणाम कमी करणे, त्यानुसार आवश्यक बदल करणे आणि भविष्यातील हवामानविषयक धोक्यांना तोंड देण्यासाठी एमएमआरला अधिक सक्षम बनविणे यावरही या सहकार्याचा भर असेल.
संशोधन आणि अनुभवांचा एमएमआरला लाभ
– उत्सर्जन कमी करणे, ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठीही संयुक्तपणे काम केले जाईल. या भागीदारीमुळे हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबत जगभरात वापरल्या जाणाऱ्या उत्तम पद्धती, संशोधन आणि अनुभवांचा एमएमआरला लाभ मिळेल. यामध्ये पॅरिस करारांतर्गत भारताने निश्चित केलेली उद्दिष्टे तसेच संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे यांच्याशी सुसंगत पद्धतींचाही समावेश असेल.
– या सहकार्याचा विस्तार शैक्षणिक क्षेत्रातही केला जाईल. संयुक्त संशोधन प्रकल्प, संशोधनासाठी अर्थसहाय्य मिळविण्याचे प्रयत्न, कर्मचारी आदानप्रदान, अभ्यागत संशोधक कार्यक्रम, संशोधन शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी आदानप्रदानासाठी संधी शोधल्या जातील. दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्यशाळा, परिसंवाद आणि परिषदा आयोजित करतील.
– संयुक्त संशोधन प्रकाशित करणे आणि संशोधनातून मिळालेले ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जातील. प्रस्तावित उत्कृष्टता केंद्रामुळे संशोधन, नवकल्पना, क्षमता विकास आणि ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होईल. – जगभरातील चांगल्या पद्धतींचा उपयोग मुंबई महानगर प्रदेशाच्या गरजांनुसार प्रत्यक्ष उपायांसाठी करता येईल. या भागीदारीमुळे शाश्वत, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज मुंबई महानगर प्रदेश उभारण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने दिली.
