मुंबईः मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात होणार आहे.

मनसेचा आजवरचा वर्धापन दिन मुंबईत साजरा होत असे. यावेळी प्रथचम हा वर्धापन दिन राजगडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आला असून त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रायगडकडे रवाना झाले. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी समाजमाध्यमातून एक निवदेन प्रसिद्ध करताना, मराठी बांधवांसाठी आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा वर्धापन दिन असल्याचे सांगितले. मनसेने गेली दोन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी आवाज उठवला आहे.

रायगडाच्या पवित्र भूमीवर हा वर्धापन दिन साजरा करणे, हे पक्षाच्या विचारधारेला आणि मराठी साम्राज्याच्या वारशाला आदरांजली वाहण्यासारखे आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम मनसेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात काही महत्त्वाचे संकेत देईल अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात होणार आहे. राज ठाकरे आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसमवेत सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ठाकरे यांच्यापासूनच सदस्य नोंदणीची सुरुवात होणार आहे. आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचे आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचे भान ठेवा आणि लोकांना पण द्या असे आदेश ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

मनसेची सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही होणार असून त्याचा तपशील राज ठाकरे जाहीर करणार आहेत. फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिर , कॅालेज , मैदान , बागा अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत. येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलेसे करत ही सभासद नोंदणी करा अशा सूचनाही ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सदस्य नोंदणी अभियानात प्रश्न आकड्याचा नाही, तशीही पक्षाची सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.