scorecardresearch

राज ठाकरेंचा शिंदे सरकारला पाठिंबा, पण अमित ठाकरेंचा ‘या’ निर्णयाला विरोध; म्हणाले “माणूस नावाचा प्राणी…”

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘या’ निर्णयविरोधात आदित्य आणि अमित ठाकरेंचं एकमत

MNS Amit Thackeray Facebook Post Aarey Metro Carshed
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'या' निर्णयविरोधात आदित्य आणि अमित ठाकरेंचं एकमत

‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी जाहीर केली आहे. आदित्य ठाकरे यांनीदेखील मुंबईकरांवर अन्याय करु नये अशी विनंती सरकारला केली आहे. महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या मागणीला आता मनसेचीही साथ मिळाली आहे. मनसे नेते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनीदेखील आरेमध्ये कारशेड होऊ नये अशी भूमिका मांडली आहे.

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग…”, उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासूत्रे हाती घेताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी ‘मेट्रो ३’साठीचे कारशेड आरेतच होईल असे जाहीर केले. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा रेटा रेटू नका असे म्हटले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी आरेत कारशेड करण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आता आरेवरून ‘कारे’ सुरू झाले असून येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पर्यावरणप्रेमी, आरेवासीय आक्रमक झाले असून ‘आरे वाचवा’ (सेव्ह आरे) चळवळ तीव्र करण्यात आली आहे.

अमित ठाकरेंची फेसुबक पोस्ट –

अमित ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी शेकडो तरुण-तरुणींना संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं”.

पुढे ते म्हणतात की, “आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान राजकीय नेत्यांना बाळगायला हवं. नवे मुख्यंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा ही आग्रहाची विनंती”.

‘जायका’ कंपंनीला पत्र..

मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) च्या निधीच्या माध्यमातून केली जात आहे. ‘जायका’च्या धोरणानुसार प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची शाश्वती संबंधित यंत्रणांना द्यावी लागते. असे असताना ‘मेट्रो ३’ प्रकल्पात मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेवर कशाप्रकारे घाव घातला जात आहे. याकडे ‘जायका’चे लक्ष वेधण्यासाठी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’चे विश्वस्त ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी ‘जायका’ला पत्र पाठविले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यादृष्टीने ‘जायका’ने यात लक्ष घालावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns amit thackeray facebook post aarey metro carshed cm eknath shinde devendra fadanvis sgy