राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लष्कराबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून घेतला आहे. आपल्या कुंचल्यातून नवे व्यंगचित्र साकारून राज ठाकरे यांनी ते फेसबुकवर पोस्ट केले आहे. या व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

‘थंडीतलं एक उबदार स्वप्न’ असे शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आले आहे. या व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत झोपले आहेत. ते स्वप्न पाहात आहेत त्यांच्या स्वप्नात ते स्वतः नवसंघिष्टांसोबत दिसत आहेत. ते म्हणत आहेत, ‘क्या है रे तिकडे? चलो पलिकडे! दांडूका देखा नही क्या हमारा? एक एकको पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या?’ मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकताच त्यांना घाबरून पाक लष्कराचे अधिकारी आणि अतिरेकी ‘भागो भागवत आया’ म्हणत पळताना दिसत आहेत. तसेच या व्यंगचित्रात मोहन भागवत यांच्या पायाशी संघ विचार, बौद्धिक, चिंतन असे लिहिलेली पुस्तके पडली आहेत. मोहन भागवत यांच्या भाषेची खिल्लीही या व्यंगचित्रात उडवण्यात आली आहे.

या व्यंगचित्रातून आपले म्हणणे राज ठाकरे यांनी चपखलपणे मांडले आहे. ११ फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्कराला सहा ते सात महिने लागतात तिथे संघाचे स्वयंसेवक दोन ते तीन दिवसात प्रशिक्षित केले जाऊ शकतात. गरज पडल्यासा स्वयंसेवक सीमेवर जायलाही तयार आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मोहन भागवत यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोहन भागवतांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली होती. तर राष्ट्रवादीनेही मोहन भागवत यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले. तसेच मोहन भागवत यांनी माफी मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. मोहन भागवत यांच्या लष्करासंदर्भातल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केले आहे. मोहन भागवत यांनी मांडलेला विचार हा फक्त त्यांच्या स्वप्नात शक्य आहे असेच या व्यंगचित्रातून अधोरेखित करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे.