mns chief raj thackeray slams congress bjp for maligning national icons zws 70 | Loksatta

महापुरुषांची बदनामी करून काय मिळवणार?; राज ठाकरे यांनी भाजप-काँग्रेसला ठणकावले

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांची बदनामी करीत आहेत.

महापुरुषांची बदनामी करून काय मिळवणार?; राज ठाकरे यांनी भाजप-काँग्रेसला ठणकावले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई: सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा खालावत असून महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, जाती-पातीचे विष कालवले जात आहे.  देश पातळीवरही राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे आणि आरे ला कारे ने चोख उत्तर देण्याचे आदेशही त्यांनी या वेळी मनसैनिकांना दिले.

गोरेगाव येथे  गटाध्यक्षांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.  कलुषित वातावरणामुळे उद्योग, मुले-मुली देशाबाहेर जात असून आपण महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत याचे भान राज्यातील नेत्यांनी ठेवावे, असे ठणकावून सांगत राज यांनी या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनाही खडसावले. 

गुजराती- मारवाडींचा पुळका घेणाऱ्या राज्यपालांनी आधी ही मंडळी व्यवसायासाठी राज्यात का आली याचा विचार करावा, केवळ राज्यपाल आहात म्हणून मान राखतोय.. राज्यात शिव्यांची कमतरता नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातून उद्योग जात असून केंद्र सरकारनेही केवळ गुजरात गुजरात न करता अन्य राज्यांकडेही समान वृत्तीने पाहावे. सगळय़ाच राज्यांचा विकास झाला पाहिजे; पण देशातील कलुषित वातावरणामुळे पाच लाख उद्योजक देशाबाहेर गेल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांची बदनामी करीत आहेत. मात्र कारागृहातून सुटून पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठीची सावरकरांची ती रणनीती होती. चांगल्या कामासाठी खोटे बोलले तरी त्यात गैर नाही हीच कृष्णनीती असल्याचा दावा करीत देशातील महापुरुषांची बदनामी थांबविण्याचे आवाहन त्यांनी  केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 01:40 IST
Next Story
फ्रिजमधून खोके कुठे गेले याचा शोध घेणार ! ; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा