मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे व संतोष धुरी हे शनिवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहून पालिका अभियंत्यांच्या निषेधाच्या धोषणा देत होते. या दोन्ही नगरसेवकांनी जामीन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील खराब रस्ते व खड्डे यांना पालिका अभियंते जबाबदार असून वारंवार सांगूनही मतदारसंघातील खड्डे बुजविण्यात न अल्यामुळे संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी मुख्य अभियंते दराडे यांच्या हाती ‘खड्डय़ांची जबबदारी माझीच’ असा फलक देत छायाचित्रे टिपली. यामुळे पालिकेतील ४,२०० अभियंत्यांनी सामुहिक राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले. यानंतर या दोन्ही नगरसेवकांना अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र राज ठाकरे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले देशपांडे-धुरी पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाले. दरम्यान अभियंत्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर खड्डय़ांचा प्रश्ना जबाबदार कोण असा सवाल करत देशपांडे व धुरी हे सायंकाळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झाले. आपण जामीन घेणार नाही, असे देशपांडे यांनी सांगितले असून अभियंत्यांवर जागोजारी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.