मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप करून अभिनेता कपिल शर्मा स्वतःच अडचणीत सापडला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी या आरोपांचा आपापल्या पद्धतीने फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यावरून राजकारण तापविण्यात येऊ लागले आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी मनसेने कपिल शर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आरोपांचे पुरावे कपिल शर्माने द्यावेत, नाहीतर त्याला मुंबईत शुटिंग करू दिले जाणार नाही, अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मांडली. त्याचबरोबर कपिल शर्माने संबंधित जागी केलेले बांधकामच बेकायदा असल्याचे पुढे येऊ लागल्यानंतर आता मुख्यमंत्री याचीही चौकशी करणार का, असा प्रश्न त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अमेय खोपकर याने कपिल शर्मावर टीका केली.
कपिल शर्माच्या ‘लाच’ आरोपाला नवे वळण, कार्यालयच बेकायदा असल्याचा दावा
ज्या ठिकाणी कपिल शर्माच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले, तिथे खारफुटीचे जंगल होते. ते तोडून तिथे बांधकाम करण्यात आले. हा सुद्धा गुन्हाच आहे. या प्रकरणात कपिल शर्माला अटक कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर कपिल शर्माच्या कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा परदेशी कलाकार ‘टूरिस्ट व्हिसा’ वापरून काम करतात. हे सुद्धा कायद्याने चुकीचेच आहे. जर परदेशी नागरिकांना इथे काम करायचे असेल, तर त्यांनी ‘वर्क व्हिसा’ घेतला पाहिजे. पण तसे होत नाही, यावर मुख्यमंत्री काय करणार, असाही प्रश्न अमेय खोपकर यांनी विचारला आहे.
भ्रष्टाचाराविरोधात नितेश राणे म्हणतात, हम भी कपिल शर्मा
कार्यालयाच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप विनोदी अभिनेता कपिल शर्माने शुक्रवारी सकाळी ट्विटरवरून केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट ट्विटमध्ये मेन्शन करून त्याने न्याय मागितला. बृहन्मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याने कार्यालय उभारणीसाठीच्या परवानगीसाठी आपल्याला ५ लाखांची लाच मागितल्याची तक्रार कपिल शर्माने ट्विटरद्वारे केली. मागील पाच वर्षांत आपण १५ कोटी रूपयांचा प्राप्तिकर भरला. आता लाच द्यावी लागत आहे, हेच का अच्छे दिन, असा सवाल त्याने पंतप्रधानांनाकडे उपस्थित केला.