scorecardresearch

“‘शिल्लक सेने’च्या ‘टोमणे मेळाव्याला’ परवानगी द्या! खंजीर, मर्द, मावळा…”, मनसेनं उडवली खिल्ली; ‘बारामती’चाही केला उल्लेख

मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्हीच घेणार असे दावे केले जात आहे.

“‘शिल्लक सेने’च्या ‘टोमणे मेळाव्याला’ परवानगी द्या! खंजीर, मर्द, मावळा…”, मनसेनं उडवली खिल्ली; ‘बारामती’चाही केला उल्लेख
दसरा मेळाव्यावरुन वाद सुरु असतानाच मनसेचं विधान

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक गट आणि एकनाथ शिंदे समर्थक गटामध्ये चढाओढ सुरु आहे. मागील काही दिवसांपासून दोन्हीकडून मेळावा आम्हीच घेणार असा दावा केला जात आहे. असं असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांकडूनही यासंदर्भात मतं व्यक्त केली जात आहेत. अशातच आता मनसेनं उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी उपहासात्मक पद्धतीने करण्यात आली असून शिवसेनेच्या मेळाव्याचा उल्लेख ‘टोमणे मेळावा’ असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही संदर्भ मनसेनं शिवसेनेवर टीका करताना दिला आहे.

नक्की वाचा >> दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

मनसेचे प्रवक्ते गजाजन काळे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ‘टोमणे प्रमुख’ असा तर शिवसेनेचा ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिल्यास भाषणातून होणाऱ्या मनोरंजनापासून जनता वंचित राहणार नाही असा टोला मनसेच्यावतीने काळे यांनी लगावला आहे.

“मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने ‘शिल्लक सेने’च्या टोमणे मेळाव्याला एकदाच काय ती परवानगी देऊन टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, निष्ठा, गद्दार यापासून महाराष्ट्राच्या होणाऱ्या मनोरंजनापासून जनतेला वंचित करु नये, अशी आग्रहाची विनंती,” असं गजानन काळे यांनी प्रसारमाध्यमांशी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

काळे यांनी उद्धव ठाकरेंचं मेळाव्यातील भाषण हे बारामतीवरुन आलं असणार असा टोला लगावत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “ज्यापद्धतीने ते (उद्धव ठाकरे) अडीच वर्षांमध्ये गेले ते पाहता ‘टोमणे प्रमुखांची’ या वेळेची स्क्रीप्ट बारामतीवरुनच आहे. फक्त हिंदुत्वाला तिलांजली वाहिल्यानंतर ‘शिल्लक सेना’ अबू आझमी आणि ओवैसी यांना सुद्धा स्टेजवर बोलवणार आहे का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी या प्रश्नाचं महाराष्ट्राला उत्तर द्यावं,” अशी मागणी काळे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या