दादरमधील शिवाजी महाराज पार्कच्या शुशोभिकरणासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. दरम्यान विद्युत रोषणाई वरून मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. या विद्युतरोषणाईसाठी लागणारे दिवे इटलीवरून मागवण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन आहे? असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेला विचारला आहे.

“शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून प्रकल्प

दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरात कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.यावर मनसेने सवाल केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीचा सर्वप्रथम विनियोग शिवाजी पार्कमध्ये करण्यात आला. उद्यानातील शिवाजी महाराजांचा पुतळय़ाबरोबरच परिसरातील रस्ते, पदपथ आणि चौक येथे कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन प्याऊचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई स्वयंचलित व विविधरंगी आहे. महाराजांच्या पुतळय़ाच्या चारही बाजूस जळती मशाल भासेल, अशारीतीने दिवे बसविण्यात आले आहेत. पुतळय़ाच्या आजूबाजूचा पदपथ, बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडे, मैदान परिसरातील प्रवेशद्वारे, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाचे भित्तिचित्रं, दीपस्तंभ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा या सर्व ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.