सविनय कायदेभंग : मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना अटक

रेल्वे पोलिसांनी केली अटक

राज्यात करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीकडे लक्ष राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला. या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग करत रेल्वे प्रवास केलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत चारफाटा येथे पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वी मनाई असताना लोकलमधून प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमवारी केला होता रेल्वे प्रवास

लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा नसल्यानं एसटी व इतर वाहनांमधून नागरिकांची परवड होत असल्याचं चित्र आहे. याकडे मनसेनं लक्ष वेधत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याची मागणी केली होती. “लॉकडाउनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सरकारला विनंती केली परंतु ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,”असं देशपांडे म्हणाले होते.

दिलेल्या घोषणेप्रमाणे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी लोकलमधून प्रवास केला. यावेळी प्रवासाचा व्हिडीओ देशपांडे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. “आम्ही अनेकवेळा सरकारला विनंती केली होती की सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू करा. बसमध्ये करोना पसरत नाही, पण लोकलमधून पसरतो, असा सरकारचा समज झाला असावा. आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत, जय महाराष्ट्र,” अशी टीका देशपांडे यांनी सरकारवर केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns leader sandeep deshpande and four other leaders arrested railway police train travelling during lockdown jud

ताज्या बातम्या