मुंबईच्या महापौरांनी पदाचा गैरवापर करून कंत्राट दिले; मनसेचा खळबळजनक आरोप

संदीप देशपांडे यांनी आयुक्तांकडे केली चौकशी करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केंद्र तयार करण्यात आले. मात्र, उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या कामावरून भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महापौरांनी पदाचा गैरवापर करून कंत्राट दिले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बृह्नमुंबई महापालिकेचे आयुक्तांना पत्र दिलं असून, त्यात महापौरांनी पदाचा गैरवापर करत कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, “करोना महामारीच्या काळात वरळीतील एन.एस.सी.आय.डोम येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत तक्रार मिळाली. सदर तक्रारीची शहनिशा केली असता सत्ताधारी शिवसेनेच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद किशोर पेडणेकर व त्यांचे जावई गिरीश रमेश रेवणकर (अतिरिक्त संचालक) असलेल्या खिस कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणी कामगार पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. कोणतीही निविदा प्रकिया न करता फक्त ई कोटेशनच्या माध्यमातून कामं दिली गेलेली आहेत. तसेच बृह्नमुंबई महापालिका अधिनियम १९८८ कलम १६(१)फ अन्वये ज्या नगरसेवकांचा कंत्राटामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची तरतूद आहे. म्हणूनच मुंबईच्या महापौरांनी पदाचा गैरवापर करून दिलेल्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी, ही विनंती,” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

आणखी वाचा- पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का? मनसेने केली महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

आणखी वाचा- मुंबईकरांना काय मिळालं?; भाजपाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

आशिष शेलार यांच्याकडून शंका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही याच प्रकरणात ट्विट करून शंका उपस्थित केली होती. “महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!,” असा गंभीर आरोप शेलार यांनी शिवसेनेवर केलेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns leader sandeep deshpande demand inquiry in covid center tender bmh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या