मुंबई : स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्स ॲपवर स्टेटसच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता बोचरी टीका केली. संख्याबळानुसार शिवसेनेचे (ठाकरे) तीन स्वीकृत नगरसेवक सभागृहात बसणार आहेत. त्यापैकी एक स्वीकृत नगरसेवकपद मिळावे अशी इच्छा मनसेने व्यक्त केली होती. मात्र, मनसेला स्वीकृत नगरसेवकपद देण्यास उद्धव ठाकरे इच्छुक नसल्याचे देशपांडे यांच्या कृतीवरून समजते आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून फारकत घेत २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांनतर संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. देशपांडे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, जागावाटप व अन्य चर्चांमध्ये देशपांडे सहभागी झाले नव्हते. मुंबई महानगरपालिकेबाबत माहिती व अनुभवाची जोड असूनही देशपांडे चर्चेत दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर संख्याबळानुसार शिवसेनेच्या (ठाकरे) वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवकांच्या जागा आल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेचे गटनेते नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. ठाकरे बंधूंच्या युतीचा उद्धव ठाकरे यांना स्पष्ट फायदा झाल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले होते. ही बाब त्यांनी राज ठाकरे यांनाही कळविली होती. तसेच, वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे किल्लेदार म्हणाले होते.
सभागृहाच्या पुढील बैठकीत स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली जाणार आहेत. मात्र, संदीप देशपांडे यांनी व्हॉट्स ॲपवर नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना कोत्या मनाचे असल्याचा उल्लेख केला. ‘कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये’, असा स्टेटस त्यांनी ठेवला. त्यामुळे मनसेला स्वीकृत नगरसेवकपद देण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. संदीप देशपांडे हे अनुभवी आणि वरिष्ठ नेते असून त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

