scorecardresearch

Video: पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मनसेचे संदीप देशपांडे निसटले; झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी

राज ठाकरेंच्या शिवतिर्थ या घरासमोरच घडला हा सारा प्रकार; संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झालाय

Video MNS
राज ठाकरेंच्या घरासमोर घडला हा प्रकार (व्हिडीओवरुन साभार)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून ज्या मशिदींमध्ये भोंग्यावरुन अजान वाजेल त्यासमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केल्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सकाळपासूनच राज्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न मनसे कर्मचाऱ्यांकडून केला जात असून पोलीसही या प्रकरणामध्ये खबरदारी म्हणून तसेच हनुमान चालीसा वाजवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे. असं असताना राज ठाकरेंच्या घरासमोर अशाच एका झटपटीमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालीय.

मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्कजवळच राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरेंची भेट घेऊन शिवतिर्थबाहेर पडलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे पत्रकारांशी संवाद साधू लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्याला प्रसारमाध्यमांशी बोलू द्या आपण सहकार्य करु असं मनसे नेत्यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मनसे नेत्यांनी राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी आज भोंग्यांवर नमाज पठण न करणाऱ्या मुस्लीम बांधवांचे अभिनंदन केल्याचंही सांगितलं. मात्र पत्रकारांशी बोलून झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीसांच्या गाडीत बसवण्यासाठी नेत असतानाच ते खासगी गाडीमध्ये बसले आणि तिथून निघून गेले. प्रतिबंधात्मक पद्धतीने पोलीस या दोघांना ताब्यात घेणार होते. मात्र त्याआधीच हे दोन्ही नेते अचानक खासगी गाडीमधून निघून गेले. चालू गाडीमध्ये बसण्याच्या त्यांच्या प्रयत्नामध्ये शिवतिर्थजवळ तैनात करण्यात आलेली एक महिला कर्मचारी धक्का लागल्याने रस्त्यावरच पडली. या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून लगेच तिला तिच्या सहकाऱ्यांनी उचलून बाजूला नेल्याचं दिसून आलं.

१३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा
राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns protest police constable injured scsg

ताज्या बातम्या