सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधामुळे दहीहंडीच्या सणात नेहमीसारखा उत्साह आढळला नसला तरी मनसेने मात्र रंग भरला होता. अन्य राजकीय पक्षांनी कारवाईच्या भीतीने सावधगिरी बाळगली असली तरी मनसेने उंच हंडय़ा आणि मनोरे रचण्यास संधी देऊन सण नेहमीसारखाच साजरा होईल यावर भर दिला होता. दहीहंडीच्या उत्सवात प्रथमच शिवसेनेपेक्षा मनसेचा बोलबाला झाला.  सर्वोच्च न्यायालयाने २० फूट उंची आणि मनोरे उभारण्यावर मज्जाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाल्यास कारवाईच्या भीतीने शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी संबंधित (काही अपवाद वगळता) मंडळांनी नियमांचे फार उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करावे, असे आवाहन बहुतेक मंडळांच्या व्यासपीठांवरून केले जात होते. दहीहंडीच्या उत्सवात आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असायचे. यंदा प्रथमच मनसे पूर्ण तयारीनिशी या उत्सवात उतरली होती. मनसेशी संबंधित मंडळांमध्ये आठ ते नऊ थरांचे मनोरे रचण्यात आले होते.

महिला पथकांकडूनही नियमभंग

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकाविण्यात महिला गोविंदा पथकेही आघाडीवर होती. विलेपार्ले स्पोर्टस् क्लबच्या महिला गोविंदा पथकांनी सहा थर रचून सलामी दिली आणि त्यानंतर नियमानुसार २० फुटांवर असलेली दहीहंडी फोडली. तर अनेक महिला गोविंदा पथकांमधील १८ वर्षांखालील गोपिकांनी थरामध्ये सहभागी होत न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविले.

११ गोविंदा पथके व एका आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची आणि १८ वर्षांखालील गोविंदांचा थरांमध्ये सहभाग करण्यास मनाई केली होती. असे असतानाही गोपाळकाल्याच्या दिवशी, गुरुवारी मुंबईतील काळाचौकी आणि चेंबूर परिसरात न्यायालयाचे आदेश झुगारुन दहीहंडी फोडणाऱ्या एकूण ११ गोविंदा पथकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काळाचौकी पोलीस ठाण्यात चार, तर चेंबूर पोलीस ठाण्यात सात गोविंदा पथकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर चेंबूरमधील एका आयोजकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनीही न्यायालयाच्या र्निबधांचे काटेकोर पालन होईल, अशी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुंबई पोलिसांनी गोविंदा पथकांना नियमाच्या चौकटीत राहून सण साजरा करण्याची सूचना केली होती. गुरूवारी काही ठिकाणांचा अपवाद वगळता नियमांनुसारच दहीहंडी साजरी करण्यात आली. काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभ्युदय नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीदरम्यान हंडीची उंची आणि बालगोविंदांचा समावेश या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ पथकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्याचबरोबर चेंबूर पोलीस ठाण्यातही आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या सात गोविंदा पथके आणि एका आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी गोपाळकाला उत्सव

मुंबई: पुढच्या वर्षी गोपाळकाला मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी येणार असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी कळविले आहे. सण-उत्सव हे चांद्र – सौर पद्धतीवर आधारलेले असतात. दरवर्षी १०-११ दिवसांनी ते मागे येत असतात. अधिक महिना आल्यावर मात्र ते पुढे जातात. पुढच्या वर्षी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे, तर मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी गोपाळकाला येत आहे, असे सोमण यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने पोलिसांवरचा ताण वाढणार आहे. त्यामुळे या दिवशी शिस्त व संयम पाळावा, असे आवाहन सोमण यांनी केले आहे.