महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन करोना रुग्णासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. महापौरांनी पदाचा गैरवापर करुन आपल्या मुलाच्या कंपनीला कोविंड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापौरांचे पुत्र साईप्रसाद पेंडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

करोनाच्या या संकटकाळात राजकारण करु नका, पण भ्रष्टाचार करा असा कारभार चालणार असेल, तर मनसे गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षाच्या खुर्चीमध्ये आहे. त्यांनी हा मुद्दा उचलून धरावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. या पत्रकार परिषदेनंतर संदीप देशपांडे यांनी एक टि्वट केले. पुत्र मोहातून शिवसेना बाहेर निघेल का? मुंबई मेयर रिजाइन असा हॅशटॅग दिला आहे.