scorecardresearch

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; पत्रात उर्दू शब्दांचा वापर

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, बाळा नांदगावकरांचा इशारा

MNS, Maharashtra Navnirman Sena, Bala Nanadgaonkar,
"अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु" (File Photo)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण उघड केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.

“मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

“अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना सांगितलं की, “पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी”.

“भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray gets life threat says bala nangaokar sgy

ताज्या बातम्या