शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेली राज ठाकरे यांची सभा कायद्याच्या कचाटय़ात सापडली आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमांनुसार शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई असतानाही मनसेच्या या सभेत सर्रासपणे ध्वनिक्षेपक वापरू देण्याची पोलिसांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी कशाच्या आधारे देण्यात आली व ती दिलीच कशी? असा सवाल करत बुधवारी त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

कायद्याला बगल देऊन मनसेच्या या सभेसाठी ध्वनिक्षेपक वापरण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याची बाब ‘वीकॉम ट्रस्ट’ने मंगळवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही परवानगी कशी दिली गेली, अशी विचारणा सरकारी वकिलांकडे केली.