मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला ३ मे म्हणजेच ईदपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. मात्र या भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला असा शाब्दिक चिमटा मनसेला गुरुवारी काढला. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरुन मनसे आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना आदित्य ठाकरेंच्या टीकेवरुन संताप व्यक्त केला. “महागाईबद्दल, पेट्रोल दरवाढीबद्दल आम्हीच बोलायचं…करोना काळात हे घऱात लपून बसले होते आणि कोमट पाणी पिण्याचे सल्ले देत होते तेव्हा लोकांच्या समस्या कृष्णकुंजवर येत होत्या त्या सोडवण्याचं कामही आम्हीच करायचं. लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्याचंही आम्ही पहायचं. मग यांनी काय फक्त संपत्ती गोळा करायची आणि पालिकेतल्या टेंडरमधील कमिशन खायचं एवढंच काम आहे का? तेवढ्यासाठीच निवडून दिलंय का? सगळं आम्हीच करायचं तर मग तुम्ही काय झक मारायला सरकारमध्ये बसला आहात,” अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली.

राज ठाकरेंना धक्का; भोंग्याच्या भूमिकेवरुन नाराज आणखी एका नेत्याचा राजीनामा; म्हणाला “आपण या जखमा…”

“तुमचे १८ खासदार संसदेत आहेत ते काय करतात. यांच्या खासदाराने आवाज उठवल्याची बातमी कधी येते का? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेतात पण मग संसदेत का तोंड बंद असतं यांचं? सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या आणि तुम्ही काय फक्त पैसे खायला बसला आहात का?,” असा संताप संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.

दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी आपण काय करतो हे पाहणं गरजेचं आहे असंही ते आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हणाले. दारुच्या किंमती कमी केला पण इंधनाचे दर कमी करत नाहीत अशी टीका यावेळी त्यांनी केली.

राज ठाकरे झाले हिंदुजननायक; पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा अधिक; हनुमान जयंतीला तापणार वातावरण

दरम्यान यावेळी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी संदीप देशपांडेंना उत्तर दिलं. “जे कुठेच नाहीत, ज्यांनी आपला पक्ष दुसऱ्याला चालवण्यासाठी दिला आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. युवासेनेने महाराष्ट्रभर महागाईविरोधात थाळीनाद केला हे त्यांना दिसलं नाही. वसुली, कमिशन हा जो कांगावा सुरु आहे….त्यांना वाटतं सारखं बोललं की ते लोकांना खरं वाटेल. मनसे आणि त्यांचे नेते लोकांसमोर उघडे पडले आहेत. लोकांना हे आपली भूमिका दर चार वर्षांनी बदलतात हे माहिती पडलं आहे. रंग बदलणे, झेंडे बदलणे सुरु आहे त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही,” असं त्या म्हणाल्या.

यावर संदीप देशपांडे यांनी भाजपासोबत युती करुन निवडणुका लढल्या आणि नंतर पवारांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही असं उत्तर दिलं. थाळीनाद केला त्याचा परिणाम काय झाला अशी विचारणा त्यांनी केली. मनसे संपलेला पक्ष आहे सांगत त्यावर रोज बोलत राहतात असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या यशवंत जाधवांचे ३१ फ्लॅट सील होतात, इतकी संपत्ती कुठून आली? अशी विचारणा त्यांनी केली.

यावर मनिषा कायंदे यांनी लावा रे व्हिडीओचं काय झालं? अशी आठवण करुन दिली. तुम्ही महाराष्ट्रविरोधी असून तुमचा पक्ष दुसऱ्यांना चालवायला दिलं आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहात आणि त्यातून मतं मिळवायची आहेत अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली. उत्तर प्रदेशातील लोकांना आकर्षित करण्यासाठी हनुमान चालिसा म्हटली जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

यावर संदीप देशपांडे यांनी ही वायफळ बडबड असल्याची टीका केली. यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाहीत अशी टीका यावेळी त्यांनी केली.