मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये पवार कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरूनही त्यांनी टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून संजय राऊत यांनीही रात्री उशिरा ट्वीट करत दिवा विझताना मोठा होतो असा टोला लगावला होता. दरम्यान त्यांच्या या टीकेला आता मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंनी संजय राऊतांवर काय टीका केली?

राज ठाकरेंनी सभेमध्ये बोलताना पवार कुटुंबीयांसोबतच संजय राऊतांना देखील टोला लगावला. “मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं”, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

दरम्यान, यावर संजय राऊतांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं. “दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं.

मनसेचं प्रत्युत्तर

त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत संजय राऊतांच्या ट्वीटला उत्तर दिलं आहे. “संपादक जेलमध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो ही नवी म्हण आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

दरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.