मनसेचे नेते संदीप देशपांडे हे गेल्या काही दिवसांपासून करोना काळातील भ्रष्टाचार उघड करणार असल्याची घोषणा करत होते. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी करोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह मांडणी करत असल्याचा दावा केला. करोना काळात काही विशिष्ट लोकांना वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे देण्यात आली. मालाड येथे उभारलेल्या करोना सेंटरची कंत्राटे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. करोना सेंटरला पुरवठा होत असलेल्या वस्तूंची पुरवठ्यापेक्षा अधिकची बिलं काढण्यात आली. प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून याची पुराव्यासह तक्रार ईडी, ईओडब्लू यांच्याकडे करणार असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत युवा सेनेचे पदाधिकारी आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्याचे नाव उघड केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप देशपांडे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे ट्विट केले होते. त्यानंतर त्याखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यावरुन युवा सेनेवरचा माझा संशय पक्का झाला. आम्ही तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक माहीती आमच्यासमोर आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वैभव थोरात या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव घेतले. करोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरविणे यासारखी कंत्राटे थोरातच्या कंपन्यांना देण्यात आली. हे काम देत असताना त्याच्या कंपनीचा कोणताही पुर्वानुभव तपासला गेला नाही. मग ही कंत्राटे देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती? याचा तपास केला पाहीजे, अशी मागणी देशपांडे यांनी केली.

या कंत्राटामध्ये प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा जास्तीची बिलं काढण्यात आली आहेत. १०० वस्तूंच्या जागी ३० वस्तूंचा पुरवठा करुन इतर वस्तू फक्त कागदावरच दाखविण्यात आल्या. वैभव थोरात आणि प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून थोरात आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाचे स्क्रिनशॉटही संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. यावेळी मालाडचे तत्कालीन प्रभाग अधिकारी मकरंद दगडखैरे उर्फ महेश पाटील हा अधिकारी आणि कंत्रादारांचे व्हॉट्सअप चॅट देशपांडे यांनी उघड केले. अधिकची बिलं लावून त्यातील हिस्सा वेगवेगळ्या लोकांना दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यासोबतच ओकांर नलावडे, सुनील नलावडे, वैभव थोरात, चैतन्य बनसोड यांची नावे या घोटाळ्यात असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले. चैतन्य बनसोड यांच्या लॅपटॉपची तपासणी केल्यावर नेमका व्यवहार कसा झाला? हे कळेल. तसेच वैभव थोरात यांच्यामागे युवा सेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याशिवाय एवढी मोठी कंत्राटे मिळू शकणार नाहीत, अशी शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. करोना काळात या कंपन्यांना ७० ते ७५ कोटींची कामे दिली असावीत. या भ्रष्टाचाराचे पुरावे ईडी, आयटीकडे देणार असून त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही केवळ व्हिसल ब्लोअर आहोत. या भ्रष्टाचाराची माहिती आम्ही फक्त जनतेसमोर आणि माध्यमांसमोर ठेवत आहोत. बाकी यंत्रणांनी याची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. यंत्रणांनी जर दखल घेतली नाही, तर मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही जाऊन याबाबत मागणी करु, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande reveals yuva sena leaders name in corona center corruption kvg
First published on: 23-01-2023 at 12:28 IST