हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेना आणि मनसेत शाब्दिक चकमक उडाली असून शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरे यांना टोले लगावल्याने चिडलेल्या मनसेने शिवसेना नेतृत्वाला आधुनिक अफझल खानाची उपमा देत त्यांनी मराठी व हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची जहाल टीका केली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही, असा टोला राज यांना लगावण्यात आला. तसेच ‘झेपेल तरच पुढे जा’असा खोचक सल्लाही शिवसेनेने राज ठाकरे यांना दिला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यास ट्विटरवरून उत्तर देताना प्रतिहल्ला चढवला. आधुनिक अफझल खानांनी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमके त्याच गोष्टीवर राज ठाकरेंनी बोट ठेवल्यामुळे झालेली पोटदुखी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून दिसली, अशी देशपांडे यांनी केली.

शिवसेनेने काळजी करू नये, त्यांच्या पोटदुखीवर आम्हीच उपचार करू, असेही संदीप देशपांडे यांनी सुनावले. उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार असल्यावरूनही देशपांडे यांनी टोले लगावले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार असतील तर त्यांना शुभेच्छाच आहेत.

पण हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला? असा प्रश्न प्रभू श्रीरामांनी विचारलाच तर त्यावर काय उत्तर द्यायचे, याचा विचार करूनच मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत जावे, असा चिमटाही देशपांडे यांनी काढला.