ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात मनसेने पत्रकार परिषद घेत जास्मिन यांची पाठराखण केली आहे. तसेच जास्मिन वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही, असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलंय. जास्मिन वानखेडे या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं, असं आव्हान देखील मनसेनं नवाब मलिक यांना दिलंय.

“नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. त्यांनी एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचं आहे. जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चांगल्या कामाच्या मागे मनसे नेहमीच उभी राहील” असंही खोपकर म्हणाले. “महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालतं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो त्यांना अटक करून दाखवा,” असं आव्हान खोपकर यांनी नवाब मलिक यांना केलं. दरम्यान, समीर वानखेडे जे काम करत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कामामुळे तरुण पिढी वाचू शकते, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलंय.

नवाब मलिक यांचे आरोप नेमके काय?

“एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली होती.