‘गर्व से कहो हम हिंदू है,’ हा नारा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. तेव्हापासून शिवसेनेची ओळख ही हिंदुत्वासाठी आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना हिंदुत्व विसरली आहे, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. त्यावरूनच आज विजयादशमीचा मुहूर्त साधत मनसेनं शिवसेनेला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केलाय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. त्यांनी शिवसेना भवनाबाहेर ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ अशा आशयाचं पोस्टर लावून शिवसेनेला डिवचलंय. तसेच या बॅनरवर विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह बाकी पदाधिकारी देखील ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ अशा आशयाची टी-शर्ट परिधान करून शिवसेना भवनाबाहेर उपस्थित होते.

“दसऱ्याचा सण हा हिंदुंसाठी फार मोठा सण आहे. विजयादशमी हा वाईट प्रवृत्तींचं दहन करण्याचा दिवस आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार केवळ राज ठाकरेच पुढे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे जे विचार पुढे घेऊन जाऊ शकतात ते गर्व से कहो हम हिंदू है,” हे वाक्य म्हणू शकतात, असं संदीप देशपांडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. तसेच शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलाय का याबद्दल देशपांडे म्हणाले की, राज्यातील जनतेला शिवसेना हिंदुत्व विसरतीये, असं वाटू लागलंय. त्यामुळे बाळासाहेबांचा विचार केवळ राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, ही भावना जनतेच्या मनात तयार होऊ लागली आहे.

यावेळी बोलताना राज्यात करोनासंदर्भातील नियम शिथील करण्यावरून देशपांडेंनी सत्ताधाऱ्य़ांवर टीका केली. सत्तेत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना ऐक कैफ असतो. जसं संजय राऊतांना मीच देव आहे, भगवान आहे, असं वाटतं, असा टोला देशपांडेंनी लगावला.