प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी; संघटित गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसणार

मध्यवर्ती तुरुंगात मोबाइल फोनची तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या तुरुंग प्रशासनाने मोबाइल जॅमरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिशेने राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे पहिल्या टप्प्यात आठ ते दहा जॅमर मिळणार आहेत. यामुळे मोबाइल फोनची तस्करीला आळा बसेल, असा विश्वास तुरुंग प्रशासनाने व्यक्त केला आहे.

याशिवाय कैदी तसेच कच्च्या कैद्यांपर्यंत मोबाइल फोन पोहोचू नये, यासाठी विविध उपाय योजण्यात येणार असल्याचे तुरुंग प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

मार्च २०१५ मध्ये नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून पाच कैदी पळून गेले होते. त्या वेळी हे कैदी असलेल्या बॅरॅकमध्ये तपासणी करण्यात आली तेव्हा चक्क २६ मोबाइल फोन्स तसेच सिम कार्डे सापडल्यामुळे खळबळ माजली होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये आर्थर रोड तुरुंगातून काही कच्च्या कैद्यांकडे चार मोबाइल फोन्स सापडले होते. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत आहेत. कुरार हत्याकांडातील प्रमुख आरोपी उदय पाठक हा मोबाइल फोनद्वारे तुरुंगातून टोळी चालवीत असल्याचे स्पष्ट झाले होते.

अबू सालेम याच्यावर गोळीबार करण्याची सुपारी छोटा शकीलने देवेंद्र जगताप याला मोबाइल फोनवरून दिली होती. नगरसेवक ब्रायन मिरांडा यांना खंडणीसाठी नाशिक तुरुंगातून सचिन खांबे आणि सचिन शेट्टे या कैद्यांनी फोन केले होते. यामुळे तुरुंगात मोबाइल फोनचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले होते.

आर्थर रोड, तळोजा तसेच ठाण्यासह राज्यातील मध्यवर्ती तुरुंगात याआधीही जॅमर बसविण्यात आले आहेत; परंतु ते कार्यरत नसावेत वा त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोबाइल फोनचा शोध घेण्याची यंत्रणाही काही तुरुंगांत असली तरी बऱ्याच वेळा कैद्यांकडून मोबाइल फोनमध्ये आवश्यकता असेल तेव्हाच सिम कार्ड टाकले जाते. त्यामुळे प्रभावी मोबाइल जॅमर यावरच भर देण्यात आल्याचेही उपाध्याय यांनी माहिती देताना सांगितले.

प्रथम नाशिक तुरुंगात अंमलबजावणी

प्रामुख्याने मध्यवर्ती तुरुंगातून सहजपणे मोबाइल फोनचा वापर होत असल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे मोबाइल जॅमर तातडीने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपाध्याय यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता. याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र टप्प्याटप्प्याने जॅमर मिळणार असल्यामुळे सुरुवातीला नाशिक तुरुंगाची निवड करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात नाशिक मध्यवर्ती तुरुंगात आठ ते दहा मोबाइल जॅमर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आर्थर रोड तसेच तळोजा तुरुंगात जॅमर बसविण्यात येणार आहेत.  – भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग