मुंबई : रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या एका मोबाइल चोराला पंतनगर पोलिसांनी अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करीत आहेत. घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहणारी दीपिका गुप्ता (१९) रविवारी रात्री ८ च्या सुमारास घरी जात होती.
हेही वाचा >>> सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक; तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तरुणीच्या हातामधील मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तरुणीने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून दुचाकीचा क्रमांक मिळविला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची माहिती मिळविली. आरोपी गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात राहत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अफजल शेख (२९) असे या आरोपीचे नाव असून तो सराईत मोबाइल चोर आहे. पूर्व उपनगरातील नेहरूनगर, शिवाजी नगर आणि आरसीएफ पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.