मोबाइल चोरांचा रेल्वे अड्डा!

एके काळी पाकीटमारांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या उपनगरी रेल्वेसेवेवर आता मोबाइल चोरीमुळे कलंक लागत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

उपनगरी रेल्वेमार्गावर २०१६पासून तब्बल ४१ हजार ८८१ मोबाइलची चोरी

एके काळी पाकीटमारांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या उपनगरी रेल्वेसेवेवर आता मोबाइल चोरीमुळे कलंक लागत आहे. २०१६पासून रेल्वेच्या तिन्ही मार्गावर तब्बल ४१ हजार ८८१ मोबाइल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. याचा दिवसगणिक हिशेब करता दररोज सरासरी ४३ मोबाइल रेल्वेतून लंपास केले जात असल्याचे दिसून येते.

रेल्वेच्या कळवा स्थानकात मोबाइल चोरीमुळे एका प्रवाशाला जीव गमवावा लागला. त्यामुळे मोबाइल चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या पाकिटावर डल्ला मारण्याऐवजी प्रवासादरम्यान सदैव त्यांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनकडे चोरटय़ांची नजर वळली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१६ पासून जुलै २०१८पर्यंत तिन्ही मार्गावर ४१ हजार ८८१ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. बोरिवली, कुर्ला, ठाणे व वडाळा पोलीस ठाण्यात सर्वाधिक मोबाइल चोऱ्यांची नोंद झाली आहे. मात्र या काळात केवळ ४ हजार ९३७ मोबाइल चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग व हार्बरवर होणाऱ्या एकूण चोऱ्यांपैकी ९० टक्के चोऱ्या या मोबाइलच्या असल्याचे लोहमार्ग पोलीस सांगतात. लोकल प्रवासात, स्थानकात गर्दीतून चालताना चोरांकडून मोबाइल लंपास केले जातात. यासाठी अनेक शक्कल लढवण्यात येतात. तीन ते चार जणांचा ग्रुप बनवून प्रवाशाला बोलण्यात गुंतवून ठेवणे, लोकल प्रवासात डब्याजवळ उभे राहून प्रवास प्रवाशाच्या हातावर दोन स्थानकादरम्यान किंवा फलाटावर उभ्या असलेल्या चोरांकडून फटका मारून मोबाइल चोरणे किंवा पादचारी पूल, स्थानकात उभ्या असलेल्या एकटय़ा प्रवाशाला हेरून मोबाइल खेचून पळ काढण्याचे प्रकार केले जातात.

आवाहनाकडे दुर्लक्ष

लोकल डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाइलवर बोलू नका, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून केले जाते. तरीही याकडे प्रवासी दुर्लक्षच करतात. हेच हेरून चोरांकडून मोबाइल लंपास केला जातो. दोन स्थानकांदरम्यान रुळावर उभे राहूनही प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल चोरला जातो.

बोरिवली अव्वल

बोरिवली, कुर्ला, ठाणे, वडाळा, कल्याण, सीएसएमटी, दादर पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीची सर्वाधिक नोंद होत आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत बोरिवली स्थानकातून पाच हजार ७७१ मोबाइल चोरीची नोंद झाली आहे. यामध्ये २०१८ च्या सात महिन्यांत २,६४१ मोबाइल लंपास झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. याच सात महिन्यात फक्त १६६ मोबाइल प्रवाशांना परत करण्यास पोलिसांना यश आले. त्यापाठोपाठ ठाणे पोलिसांकडेही २०१६ पासून ५,४८० आणि कुर्लामध्ये ५,३९८ मोबाइल चोरी झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या एकूण चोऱ्यांपैकी ९० टक्के चोऱ्या मोबाइलच्या आहेत. २०१६ पासून आकडेवारी वाढलेली दिसली तरी त्यामागे चोरीची तक्रार नोंदविण्याचे पोलिसांनी वाढविलेले प्रमाण हेच आहे.

-निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mobile thieves railway station

ताज्या बातम्या