मुंबई : भारतीय हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी मंगळवारी रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस झाला नाही. शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज चुकल्याचे काही प्रमाणात दिसून येत आहे.  

मुंबई आणि उपनगरांत मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत (मागील २४ तासांतील पाऊस) सांताक्रूझ केंद्रात ३५.६ मि.मी. तर कुलाबा केंद्रात ५५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु मुंबईतदेखील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. सोमवारीही पावसाचा जोर कमी होता. अर्धा जून संपला तरी मुंबईसह राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या नाहीत. मोसमी पावसाने राज्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे, तरी पावसाचे प्रमाण अद्याप सरासरीच्या तुलनेत कमी आहे.

मुंबईत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून २४ आणि २५ जून रोजी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. गेले काही दिवस मुंबईकडील पाऊस उत्तरेकडे सरकल्याने पालघर, डहाणू या भागात पाऊस जास्त प्रमाणात दिसून आला. मुंबईत सध्या पडणाऱ्या पावसाच्या नोंदी या मुसळधार पावसाच्या नोंदीच्या जवळ आहेत. त्यामुळे या पावसाला मध्यम पाऊस म्हणता येणार नाही. – कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान विभाग

पावसाची वर्गवारी..

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वर्गवारीनुसार, एका दिवसात ०.१ मि.मी. ते २.४ मि.मी. पाऊस म्हणजे खूप हलका पाऊस, २.५ मि.मी. ते १५.५ मि.मी. पाऊस म्हणजे हलका पाऊस, १५.६ मि.मी. ते ६४.४

मि.मी. पाऊस म्हणजे मध्यम पाऊस, ६४.५ मि.मी. ते ११५.५ मि.मी. पाऊस म्हणजे मुसळधार, ११५.६ मि.मी. ते २०४.४ मि.मी. पाऊस म्हणजे अतिमुसळधार आणि २०४.५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टीचा पाऊस.