आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदू वोट बँकेचे राजकारण देशाच्या ऐक्यासाठी व अखंडतेसाठी धोकादायक आहे, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. मोदींच्या राज्यात धार्मिक अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याची टीका त्यांनी केली.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर सीताराम येचुरी पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आदिवासींचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी डॉ. अशोक ढवळे, महेंद्र सिंग, नरसय्या आडम, जे. पी. गावित, आदी नेते उपस्थित होते. आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, अनुसूचित जाती-जमातीचा सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरावा, वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आदिवासी भागात नवीन कारखाने सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
आदिवासी मोर्चानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पाश्र्वभूमीवर येचुरी यांनी टीकेची झोड उठविली. मोदी सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून देशातील सामाजिक वातावरण बिघडू लागले आहे.
घरवापसी, लव्ह जिहाद, असे सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित आहे. मोदींचे हे हिंदू वोट बँकेचे राजकारण देशाचे ऐक्य व अखंडतेसाठी धोकादायक आहे, असा आरोप त्यांनी केला. परदेश दौऱ्यात मोदी आपल्या देशातील विरोधी पक्षांवर टीका करतात, असे यापूर्वी कधी घडले नव्हते, असे ते म्हणाले.