मुंबई : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील मोघरपाडा कारशेडच्या बांधकामाचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. कारशेडसाठीच्या कामासाठी आवश्यक असलेली ०.३९ हेक्टर (३,९०० चौ. मी) जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) देण्यास राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार लवकरच ही जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरित केली जाणार आहे.

एमएमआरडीएकडून ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख’ अशा एकूण ३५.२ किमी लांबीच्या ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेची कामे सुरू आहेत. या मार्गिकेतील कारशेड ठाण्यातील मोघरपाडा येथे प्रस्तावित आहे. मात्र ही कारशेड सुरुवातीपासूनच वादात अडकली होती.

कारशेडची जागा देण्यास प्रचंड विरोध होत होता. पण अखेर मोघरपाड्याची जागा एमएमआरडीएला मिळाली. त्यानुसार मोघरपाड्यातील १७४.१० हेक्टर जागेवर कारशेड उभारली जाणार आहे. दरम्यान, या कारशेडअंतर्गत जोडरस्ता आणि इतर कामांसाठी मोघरपाडा आणि वसई खाडीदरम्यानची कांदळवनाची ०.३९ हेक्टर जागा आवश्यक होती. ही जागा अधिसूचित नसलेल्या कांदळवन क्षेत्राशी संबंधित होती. त्यामुळे एमएमआरडीएने ऑक्टोबर २०२४ मध्ये या जागेवरील कांदळवने हटविण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आवश्यक त्या अटींची पूर्तता करून फेब्रुवारी २०२५ मध्ये केंद्र सरकारने या प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली. आता राज्य सरकारने कांदळवनाची जमीन एमएमआरडीएला कारशेडच्या कामासाठी वळविण्यास मंजुरी दिली आहे.

यासंबंधीचा शासन निर्माण नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. मात्र ही मंजुरी देताना पर्यावरण मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये घातलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले आहेत.

अधिसूचित क्षेत्रात नसलेली ही जागा आता एमएमआरडीएकडे वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे आता मोघरपाडा कारशेडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. मोघरपाड्यातील १७४.१० हेक्टर जागेवर आता ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ची कारशेड उभारली जाणार आहे. ही कारशेड आशियातील सर्वात मोठी कारशेड ठरणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. मानखुर्दमध्ये ३०.४५ हेक्टर जागेवर पसरलेली कारशेड आतापर्यंतची सर्वात मोठी कारशेड म्हणून ओळखली जात आहे. मात्र मोघरपाडा कारशेड तयार झाल्यास ती आशियातील सर्वात मोठी कारशेड ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मिरारोड-गायमुख मेट्रो १० मार्गिकेसाठीही याच कारशेडचा वापर केला जाणार आहे.