मुंबई : पश्चिम उपनगराची पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मोगरा उदंचन केद्रांच्या बांधणीला आता वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या तब्बल पाच ते सहा वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. मोगरा उदंचन केंद्राचे काम पूर्ण झाल्यास पश्चिम उपनगराला विशेषत: अंधेरी परिसराला दिलासा मिळणार आहे.

चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीच्या वेळी पावसाचे पाणी साचते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरत असल्यामुळे पातमुखे बंद करावी लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता. त्यापैकी हाजीअली, ईर्ला, लवग्रोव, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रे बांधून कार्यान्वित झाली आहेत.

तर अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे काम रखडले होते. हे उंदचन केंद्र बरीच वर्षे विविध कारणामुळे रखडले आहे. त्यामुळे अंधेरी परिसराला पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते आहे. मात्र या प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व परवानग्या आता मिळाल्या असून लवकरच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

मोगरा उदंचन केंद्र का रखडले

एकूण आठ उदंचन केंद्रापैकी अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे व माहूल उदंचन केंद्राचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. सहा वर्षांपूर्वी पालिकेने मोगरा व माहुल या दोन उदंचन केंद्रासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र जमीन अधिग्रहण होऊ न शकल्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोगरा उदंचन केंद्र हे नाल्याच्या प्रवाहातच बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नाल्याच्या जमिनीच्या मालकीचा मुद्दा न्यायालयात गेला. या जागेवर दोन जणांनी दावा केला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मोगरा उदंचन केंद्र रखडले होते. न्यायालयाने या प्रकल्पाबाबत कोणतेही काम करण्यास मनाई केल्यामुळे हे काम रखडले होते.

मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायालयाने ही स्थगिती उठवली. या वादातील तोडगा म्हणून पालिकेला ३३ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र या कामामध्ये नंतर नवीनच पेच निर्माण झाला होता. मोगरा उदंचन केंद्र मोगरा नाल्याच्या प्रवाहातच बांधण्यात येणार आहे. मात्र ही जागा वर्सोवा -दहिसर दरम्यान प्रस्तावित सागरी किनारा मार्गाच्या आड येत असल्यामुळे या प्रकल्पाची जागा थोडी पश्चिम दिशेला सरकवावी लागली. त्यामुळे या प्रकल्पासाठी सीआरझेडची पुन्हा एकदा परवानगी घ्यावी लागली.

या भागांना दिलासा मिळणार

अंधेरी, जोगेश्वरी, मालपाडोंगरी ते वर्सोवा या भागातील ७.४३ चौ. किमी. क्षेत्रामधील पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मोगरा नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात उदंचन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. त्याकरीता २९० कोटींचे कंत्राट देण्याचे २०२१ मध्ये निश्चित करण्यात आले होते.

केंद्र सरकारचा प्रकल्प

मुंबईतील पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. याकरीता केंद्र सरकार काही निधी देणार आहे. शहरातील जलनिस्सारण, पंपिंग व्यवस्था, नाल्यांची क्षमता वाढविणे, मिठी नदी सुधारणा तसेच निसर्गाधारित उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे. या महाप्रकल्पात मोगरा उदंचन केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे.