मुंबई : ‘समाजातील अल्पसंख्य असलेल्या घटकाचे अहित झाले तरी त्याची झळ बहुसंख्याकांनाही बसते. त्यामुळे बहुसंख्याकांचे अधिकाधिक कल्याण करणे, हे आपले ध्येय नाही. हा भेदाभेद करणाऱ्या विचारांनी जगाचे भले होणार नाही, हे आपल्या पूर्वजांनी ओळखले होते. ‘सर्वांचे मंगल होवो’ हीच भारतीय विचारपरंपरा आहे,’ असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बहुसंख्याकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या राजकीय भूमिकेला फाटा दिला.

तसेच, जगाचे मंगल साधायचे असेल, तर त्यासाठी साधन म्हणून सशक्त राष्ट्र आवश्यक आहे. मात्र धर्माचरण क्षीण झाले तर राष्ट्राची अधोगती होते आणि राष्ट्र दुर्बल झाले तर धर्म धोक्यात येतो. त्यामुळे दोन्हींचे संतुलित संवर्धन करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत भागवत यांनी राष्ट्र उभारणीत धर्माचे महत्त्व अधोरेखित केले.

जैन साधू-संतांसाठी कार्यरत असलेल्या ‘विहार सेवा ग्रुप’च्या वतीने बोरीवली येथे आयोजित १४व्या संमेलनात भागवत बोलत होते. या वेळी जैन साध्वी, मुनी तसेच जैन समाजातील नागरिक उपस्थित होते.

‘भारताचे राष्ट्रजीवन कोणत्याही राजाने निर्माण केलेले नाही. सर्वस्वाचा त्याग करून देशभर भ्रमण करणाऱ्या श्रमण आणि ब्राह्मण परंपरेतील साधू-संतांनी समाजजीवन घडविले. जगाच्या कल्याणासाठी ज्ञान आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी या परंपरेने स्वीकारली. धर्मांच्या पलीकडे बंधुभाव आणि मानवता हा व्यापक धर्म आहे,’ असेही भागवत यांनी नमूद केले. ‘जगाच्या व्यवहारात सर्व काही परस्परांपासून अलग असल्याचे दिसत असले, तरी मूलतः सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत, हे रहस्य आपल्या पूर्वजांना उमगले होते. आपण एकमेकांशी संबद्ध असल्यामुळे एखाद्याचे अहित झाले, तर त्याची परिणती अखेरीस सर्वांनाच भोगावी लागते,’असे भागवत यांनी सांगितले.

आजच्या जगातील अनेक प्रश्न हे परस्परविरोधी उद्दिष्टांमधून निर्माण झाले आहेत. विकासाची गती वाढली की पर्यावरणाची हानी होते. पर्यावरणाचे रक्षण करायचे तर विकासासमोर मर्यादा येतात. व्यक्तिस्वातंत्र्याचा विस्तार झाला की कुटुंब आणि समूहभावना दुर्बल होतात. समूहाचे हित जपायचे तर व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने येतात. धर्मावरील श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न केला की त्याचे रूपांतर कट्टरतेत होण्याचा धोका निर्माण होतो. या परस्परविरोधी टोकांमध्ये समतोल साधण्याचा मार्ग जगाला सापडत नसल्याचे भागवत यांनी नमूद केले.

न्यूयॉर्क, टोरांटो आणि लंडनच्या अलीकडील दौऱ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, जग आज अशा अनेक पेचप्रसंगांनी ग्रासले आहे. प्रत्येक व्यक्तीचे सुख साधताना दुसऱ्याचे नुकसान होऊ नये, प्रत्येक निष्ठेचा दुसऱ्या निष्ठेशी संघर्ष होऊ नये आणि विकासासोबत पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी समतोल दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. अतिवाद नव्हे, तर सम्यक दृष्टी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जगाला भारताच्या ज्ञानपरंपरेकडून अपेक्षा

भारताकडे या प्रश्नांवर विचार करण्याची प्रदीर्घ परंपरा असून, जगाला त्याची आवश्यकता आहे, असा दावा भागवत यांनी केला. भारताने हजारो वर्षांच्या इतिहासात इतर देशांवर आक्रमण करून किंवा धर्मांतराच्या माध्यमातून आपली विचारधारा लादली नाही. सुख-शांतीचा मार्ग दाखविण्याची भारताची परंपरा राहिली आहे. त्यामुळे आज जगाचे लक्ष भारताकडे लागले असल्याचे ते म्हणाले.

भारतीय परंपरेतील हा ज्ञानवारसा केवळ ग्रंथांमध्ये जतन करून उपयोग नाही. तो आचरणातून व्यक्त झाला पाहिजे. जीवनाच्या अनुभवातून आलेले शब्द ऐकणाऱ्यांच्या बुद्धीत रुजले आणि मनात उतरले, तरच ते जीवनदृष्टी घडवू शकतात. अशा प्रकारे हा ज्ञानवारसा जपणाऱ्या व्यक्ती आणि परंपरांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले.

जैन ज्ञानपरंपरेच्या संरक्षणासाठी सहकार्य

जैन साधू-संत हे ज्ञानपरंपरेचे वाहक असून त्यांचे संरक्षण करणे ही व्यापक सामाजिक जबाबदारी आहे. ज्या भागांत जैन समाजाची संख्या कमी आहे, तेथे संघाचे स्वयंसेवक सहकार्य करतील, असे भागवत यांनी सांगितले.

यासाठी प्रत्येक वेळी वरिष्ठ पातळीवरील आदेशाची आवश्यकता नाही. स्थानिक पातळीवर संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद राहिल्यास आवश्यक ते सहकार्य केले जाईल. ज्ञानपरंपरा जतन करणाऱ्या प्रत्येक जैन मुनीच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक तत्पर राहतील. तुम्हाला सहकार्य करणे हे स्वयंसेवकांचे सौभाग्य आहे, असे भागवत म्हणाले. समर्पण म्हणजे सर्वस्व अर्पण करणे. मात्र व्यापक, निर्मळ आणि उदात्त ध्येयासाठी केलेले समर्पण अखेरीस व्यक्तीच्या जीवनालाही समृद्ध करते. विहार सेवा ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे केवळ एका समाजाच्या सेवेशी संबंधित नसून ज्ञानपरंपरेचे आणि मानवजातीच्या भवितव्याचे जतन करणारे कार्य आहे, असे भागवत यांनी सांगितले.