मुंबई : भाजप हा राजकीय पक्ष असून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) नाही, भाजपमध्ये संघाचे काही नेते काम करतात आणि ते प्रभावीही आहेत. पण भाजप किंवा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर संघाचे नियंत्रण किंवा रिमोट कंंट्रोल नाही, असे परखड मतप्रदर्शन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी नेहरु सेंटरमध्ये केले. भाजपवर संघाचा रिमोट कंट्रोल चालतो, अशा कायम सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत यांनी व्यक्त केलेले मत महत्वाचे आहे. रा.स्व.संघ भाजपपासून सुयोग्य अंतर राखून असल्याचेही निदर्शक आहे. संपूर्ण हिंदू समाज संघटन आणि बलशाली राष्ट्र उभारणी एवढेच संघकार्य असून ते करताना अन्य कामांसाठी कार्यकर्त्यांना फुरसतही नसल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले आहे.

भागवत यांचे ‘ संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज ’ या विषयावर नेहरु सेंटरमध्ये शनिवारी व्याख्यान झाले. विविध क्षेत्रांमधील मान्यवरांपुढे भागवत यांनी संघाची उद्दिष्टे व कार्याचा प्रवास उलगडून दाखविताना संघाबद्दल असलेल्या समज-गैरसमजांवरही परखडपणे भाष्य केले आहे. संघ समजून घेण्यासाठीचे मापदंड कोणते आणि संघाची कार्यपद्धती काय आहे, हेही त्यांनी समजावून सांगितले. संघाकडे पाहण्याची दृष्टी व समजांबद्दल बोलताना भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. मोदी हे स्वयंसेवक आहेत. भाजप हा राजकीय पक्ष असून संघाचे अनेक नेते त्यात आहेत व ते प्रभावीही आहेत. पण म्हणून भाजप संघाचा नाही. राष्ट्रउभारणी आणि हिंदू समाज संघटन हे कार्य वेळखावू असल्याने अन्य काही करण्यास कार्यकर्त्यांना पुरसत नाही आणि त्याव्यतिरिक्त कोणतेही काम करायचे नाही, असा निर्णय संघाने घेतला आहे. त्यामुळे संघाचा भाजपवर रिमोट कंट्रोल नाही, असे भागवत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने संघ व भाजप यांचे काम आणि कार्यपद्धती वेगवेगळ्या असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता देशभरात एक लाख ३० हजार सेवाभावी प्रकल्प सुरु आहेत. संघ कार्यकर्ते राजकारणासह सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. पण जी चर्चा होते, त्यानुसार संघाचा रिमोट कंट्रोल कोणावरही (भाजप) नाही. प्रत्येक स्वयंसेवक इच्छेने व मनापासून आपले काम करतो, असा उल्लेख करुन भाजपवर आपले नियंत्रण नसल्याचे भागवत यांनी सूचित केले. चांगल्या कामात संघ सर्वांनाच मदत करतो, तसा त्यांनाही (भाजप) करतो. राष्ट्रउभारणीबाबत संघाचा एक विचार असून त्यानुसार ज्या गोष्टी घडतील, असा आमचा प्रयत्न असतो. त्यानुसार जे विचार ठेवतील, त्यांना लाभ होतो आणि जे तसे विचार ठेवत नाहीत, त्यांना लाभ होत नाही. आम्ही कोणालाही लाभ देण्यासाठी कार्य करीत नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपकडून जे निर्णय संघ विचारांशी सुसंगत होतात, त्याला पाठिंबा दिला जातो आणि त्याचा राजकीय लाभही भाजपला होतो, असे भागवत यांनी दर्शविले आहे.

धर्म आणि रिलीजन वेगळे

हिंदू ही जीवनपद्धती आणि विचारधारा असून भारतातील आणि अन्य देशांमधील मुसलमान, ख्रिश्चन हे वेगळे आहेत, असा उल्लेख करुन भागवत यांनी पूजापद्धती, धर्म वेगवेगळे असले तरी भारतीय नागरिक सर्वच हिंदू आहेत, असे नमूद केले. त्यामुळे हिंदू न म्हणता भारतीय किंवा आम्ही हिंदवी आहोत, असा उल्लेख कोणी केला, तरी त्याच्याशी सहमत असल्याचे सांगून संघाचे हिंदुत्व व्यापक असल्याचे स्पष्ट केले. समाज जोडण्याचे कार्य संघ करीत असून भारत हे भूगोलाचे नाव नाही, स्वभावाचे नाव आहे, असेही सांगितले. अन्य देश, तेथील धर्माची व्याख्या व अन्य संकल्पनांची तुलना सांगताना धर्म व रिलीजन वेगळे आहेत, अशी संकल्पना भागवत यांनी मांडली. अन्य देशांमध्ये व्यक्तीचा धर्म, समाज माहीत आहे, पण ‘ परमेष्टी ’ माहीत नाही. सर्वांचे कल्याण आणि समाज जोडण्याचे काम संघ करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विश्वगुरु व्हायचे आहे, पण केवळ भाषणातून नाही

विखुरलेला समाज संघटित करुन राष्ट्रउभारणी करायची आहे. देश मोठा झाल्यावर विश्व मोटे होईल. पण आपल्याला महाशक्ती व्हायचे नाही. महाशक्ती कठोर सक्ती (दंडा चालविते) करते, याचा अनुभव आपण घेत आहोत. तसे आपल्याला करायचे नाही, विश्वगुरु व्हायचे आहे. पण केवळ भाषणातून नाही, कार्यातून करायचे आहे, असे भागवत यांनी नमूद केले.