मुंबई : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ६ ऑगस्टला मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्सच्या (आयआयएमयुएन) १५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक अजिंक्यपद (चॅम्पियनशिप) परिषदेत हा संवाद होणार आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून जेन झी आणि जेन अल्फा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीची केंद्रातील भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार आंदोलने सुरू आहेत. तरुण भीडभाड न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात रस्त्यावर उतरूनच नव्हे तर त्याना सहजसाध्य असलेल्या इंस्टाग्राम, यूट्यूबसारख्या समाजमाध्यमावरही व्यक्त होत आहेत. तरुणांचा आक्रोश इतका तीव्र होता की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. गेली अनेक वर्षे जनमानसाची नस अचूक ओळखणाऱ्या भाजपलाच नव्हे, तर संघालाही हा एक जबरदस्त धक्का मानला जात आहे. म्हणून गेल्या काही दिवसात संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तरुण पिढीशी अधिक संवाद साधण्यावर तसेच त्यांची ऊर्जा राष्ट्रनिर्माणासाठी वापरण्याची भूमिका संघाच्या नेत्यांकडून सातत्याने मांडली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘भारतीय मूल्यांच्या आधारे वैश्विक एकात्मता साध्य करण्यात युवकांची भूमिका’ या विषयावर जेन झी आणि जेन अल्फा विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

आयआयएमयुएन २०११ पासून कार्यरत असलेली तरुणांची मोठी संस्था आहे. ही संस्था शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व, राजकीय, सामाजिक नेतृत्वगुण वाढवण्याचे काम करते. यामध्ये विद्यार्थी विविध देशांचे प्रतिनिधी (डिप्लोमॅट) बनून संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर एकत्र येऊन चर्चा करतात आणि त्यावर उपाय शोधतात. संस्थेच्या सल्लागार मंडळात उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, चित्रपट निर्माते करण जोहर, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे माजी प्रमुख तसेच माजी ऑलिम्पियन पी. टी. उषा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे.

सध्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तरुणांशी होणारा सरसंघचालकांचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. नेतृत्व म्हणजे केवळ पुढील पिढीला दिशा देणे नव्हे, तर तिचे विचार ऐकून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याच उद्देशाने डॉ. मोहन भागवत यांना विद्यार्थ्यांशी संवादासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असे आयआयएमयुएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी सांगितले. वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात देशातील १०० हून अधिक शहरांतील १५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होतील.