विवाहितेला त्रास दिल्याप्रकरणी लष्करातील आनंद गावडे (वय २३) या जवानाविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची वर्षभरापूर्वी आनंद गावडे याच्याशी मैत्री झाली होती. मात्र आनंद तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. वर्षभरापूर्वी या तरुणीचे लग्न झाले. तेव्हापासून आनंद आपल्याला त्रास देत असल्याचे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी आनंदने फेसबुकवरून तिचे फोटो चोरून त्यात बदल केले होते. ‘व्हॉटस अ‍ॅप’  वरून हे फोटो पाठवून तो तिला धमकावत होता. तो दररोज तिला दीडशेहून अधिक दूरध्वनी करत होता, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी सांगितले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दिली.